‘माई’ अर्थात रुक्मिणी सातारकर यांचं दोन फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झालं. बाबामहाराज सातारकर यांच्या अध्यात्माच्या विचार प्रसाराच्या कार्यात त्यांनी सक्रीय योगदान दिलं होतं. आठ-नऊ महिन्यांच्या अंतराने दोघांनीही जगाचा निरोप घेतल्याने वारकरी संप्रदायात पोरकेपणाची भावना व्यक्त होत आहे.
बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंत्यदर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल.
बाबामहाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.
बाबामहाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ माईसाहेब यांचीही मोलाची साथ होती.
बाबामहाराज यांच्या घरात गेल्या १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदयाची परंपरा आहे. बाबामहाराज सातारकर यांचं इंग्रजी माध्यमात एसएससीपर्यंत शिक्षण झालंय. तर ८ व्या वर्षांपासून ते कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे. बाबा महाराज यांच्याकडे गेल्या ८० वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानकरी परंपरा आहे. तर तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर मानकरी परंपरा १०० वर्षांपासून राखली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News