मुंबई, दि. २६ : “ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्राची विठ्ठल, ज्ञानेश्वर भक्तीची परंपरा, वारकरी सांप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. साध्या, सोप्या, रसाळ, ओघवत्या वाणीतल्या कीर्तनांनी महाराष्ट्राचे प्रबोधन केले. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या किर्तनांनी व्यसनमुक्तीच्या लढ्याला बळ दिले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात बाबा महाराजांचे स्वतंत्र स्थान होते. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी आहे. बाबा महाराजांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
०००