भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमीला अभिवान करीत समतेचा जागर करतात. करोनाची दोन वर्षे सोडली तरी दरवर्षी या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी नागपुरात दाखल होतात. यंदा होणाऱ्या सोहळ्यासाठी श्रीलंका येथील रेव्ह डब्ल्यू धम्मरत्न थेरो प्रमुख आकर्षण असतील. तर थायलंड येथील डॉ. अफिनिता चाई चाना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्री सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई असतील. मुख्य सोहळा मंगळवारी सायंकाळी होणार असला तरी दोन दिवसांपासून धम्म दीक्षा व इतर कार्यक्रम दीक्षाभूमीवर सुरू आहेत.
यंदा दीक्षाभूमीवर येणाऱ्या परराज्यातील नागरिकांमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमधील अनुयायांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सम्राट अशोकाच्या पुतळ्यासह शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले. सोमवारी दिवसभर हजारोंनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अनुयायांना अनुयायांना माहिती देण्यासाठी महापालिकेमार्फत दीक्षाभूमीत चौकात एलएडी स्क्रीनची व्यवस्था केली गेली आहे. मुख्य कार्यक्रमाच्या थेट प्रसारणाची व्यवस्था समितीमार्फत करण्यात आली आहे. परिसरात यासाठी जागोजागी एलएडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात पुस्तकांची दुकाने आहेत. अनेक संघटनांमार्फत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘भारताचे संविधान’ अत्यंत माफक दरताउपलब्ध करून दिले जात आहे. ‘जयभीम’चा लोगो आणि बाबासाहेबांचे चित्र असलेल्या टी-शर्ट, टोपी यांची मोठ्या प्रमाणात दुकाने बघावयास मिळत आहेत. महिला वर्गासाठी पांढऱ्या शुभ्र साड्यांची दुकाने आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
कोट्यावधींच्या पुस्तकांची विक्री होणार
दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र दिन सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंचा भीमसागर उसळतो. धम्मचक्र दिन सोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात होणारी पुस्तक विक्री. यंदाही, धम्मचक्र दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात दोन दिवसात कोट्यावधींच्या रुपयांच्या पुस्तकांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीमध्ये तीनशेच्यावर पुस्तकांची दुकाने लागलेली आहे. दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक अनुयायी किमान एक तरी पुस्तक आपल्याबरोबर नेतो. दीक्षाभूमीवरील एका पुस्तक विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीवर सर्वाधिक मागणी ‘भारताचे संविधान’ आणि ‘भगवान बुद्ध व त्यांचा धम्म’ या पुस्तकांना आहे. याशिवाय महात्मा फुले, बिरसा मुंडा, शाहू महाराज यांच्यावर आधारित पुस्तकांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते.
हरविलेल्यांना शोधण्यासाठी हे करणार ‘सहयोग’
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध राज्यातून अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. लाखो लोकांच्या गर्दीमुळे अनेक लोक हरवतात. या लोकांना मदत करण्यासाठी ‘सहयोग’ संस्थेचे विशेष पथक दीक्षाभूमीवर कार्यरत राहणार आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी ‘सहयोग’चे पथक विशेषत: कार्य करते. १९८९ सालापासून ‘सहयोग’ संस्थेचे लोक दीक्षाभूमीवर सेवा देत आहेत. सहयोग संस्थेच्या कार्याची व्याप्ती बघता दीक्षाभूमीवर तैनात पोलिसही हरविलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेची मदत घेतात. आजवर सहयोग संस्थेच्यावतीने हजारो नागरिकांना सुखरुपपणे त्यांच्या नातेवाईकांपर्यत पोहोचविण्याचे कार्य सहयोग च्यावतीने करण्यात आले आहे. सहयोगचे पदाधिकारी हरविलेल्या लोकांना स्वयं खर्चाने त्यांच्या मूळगावी पोहोचवतात.
तब्बल वीस लाखांचा पुतळा
दीक्षाभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात पुतळ्यांची दुकानेही लावण्यात आली आहेत. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. या पुतळ्यांच्या किंमती हजार रुपयांपासून ते वीस लाखांपर्यंत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना विशेष मागणी असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. अष्टधातूपासून निर्मित या पुतळ्यांची आंबेडकरी संस्था, बौद्ध विहार समितीद्वारा मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पुतळ्यांच्या या दुकानावर सेल्फी काढण्यासाठीही मोठ्या संख्येत अनुयायांनी गर्दी केली होती.
हार,फूल नको वही-पेन आणा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही वैचारिक होती. शिक्षणाच्या माध्यमातून विचारांचा प्रसार-प्रचार व्हावा हा त्यांच्या हेतू होता. या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हार,फूल नको तर वही-पेन आणावे असे आवाहन करण्यात आले. दीक्षाभूमीवर यासाठी एक वही, एक पेन हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. आंबेडकरी संघटनातील विविध संघटनांच्यावतीने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयांयाकडून वही-पेन दान केले जातात आणि नंतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जातात. दीक्षाभूमी स्तुपा समोरील मेट्रो भवनाजवळ या उपक्रमासाठी विशेष स्टॉल लावण्यात आले आहे.
ड्रॅगन पॅलेसमध्ये भीमसागर
दीक्षाभूमीवर देशभरातून येणारे अनुयायी अगत्याने कामठी येथील ड्रॅगन पॅलेस ला भेट देतात. ड्रॅगन पॅलेसमध्ये अनुयायांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ११ वाजता ड्रॅगन पॅलेस येथे विशेष कार्यक्रम पार पडेल. सायंकाळी परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ड्रॅगन पॅलेस सह नागलोक, बुद्धभूमी खैरी आणि चिचोली येथेही मोठ्या संख्येत अनुयायांनी गर्दी केली होती.
Read Latest Maharashtra News And Marathi News