नागपूर: जिल्ह्यातील चिचाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेच्या रिकाम्या खुर्चीवर पंखा कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. फोनवर बोलण्यासाठी त्या शिक्षिका वर्गाबाहेर गेल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला. यावेळी, विद्यार्थीही वर्गात उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील चिचाळा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. शनिवारी सकाळी रोजच्या प्रमाणे शाळा सुरू होती.
शाळेच्या कार्यालयातच सातवीचा वर्ग सुरू होता. या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षिकेला फोन आल्याने त्या बोलण्यासाठी वर्गाबाहेर गेल्या. त्या फोनवर बोलत असताना त्यांच्या खुर्चीवरच पंखा पडला. सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. शनिवारी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली. जिल्हा परिषद शाळेची ही इमारत २०१० मध्ये बांधण्यात आली होती. या शाळेच्या छतावर सातत्याने पाणी साचते.

याशिवाय, विविध ठिकाणी पाणी गळण्याचाही त्रास होतो. यामुळे, इमारतीचे लोखंड गंजले आहे. अशीच गंजलेली सळाख तुटल्याने पंखा वर्गात कोसळल्याची घटना घडली. जिल्हा परिषदेच्या विविध शाळांच्या इमारतींची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. या शाळांच्या भिंती कोसळण्याच्या घटनाही घडत असतात. अशा शिकस्त अवस्थेतील इमारतींची डागडुजी करण्याची किंवा नवी इमारत बांधण्याची मागणीही वारंवार होत असते. मात्र, जिल्हा परिषदेकडून त्याबाबत दिरंगाई केली जाते. शनिवारच्या घटनेने जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे.