राजगुरुनगर शहरात मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुक्यातील अनेक विद्यार्थी एस टी बस ने येत असतात. काही टवाळखोर विद्यार्थ्यांकडून मुलींची छेड काढली जाते. महाविद्यालय सुटल्यानंतर शहरातील बसस्थानकामध्ये विद्यार्थीनींची मोठी गर्दी असते. मात्र, छेडछाडीच्या या प्रकारांमुळे विद्यार्थीनी त्रस्त झाल्या आहेत.
टवाळखोरांनी छेड काढल्याचे घरी सांगितल्यावर शिक्षण बंद होईल या भीतीपोटी मुली कोणतीच तक्रार न करता निमुटपणे त्रास सहन करीत आहेत. मुलींच्या छेडछाडीवरून अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत. मात्र पोलिसांचे साफ दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी वेळीच टवाळखोर, रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
या हाणामारीच्या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास वेळ लागणार नाही असे बोलले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी घटना घडल्याने पोलीसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी येणारी मुले ही शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर गुन्हेगारी वाढण्यास वेळ लागणार नाही असेच या घटनेवरून समोर येत आहे.
Read Latest Maharashtra News And Pune News