दीक्षाभूमीवर २४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे सक्रिय होतात. त्यांचा बंदोबस्त करण्यावर पोलिसांचा भर असणार आहे. त्यासाठी पोलिस या परिसरात खाकी वर्दीसह साध्या वेशातही तैनात राहतील.
दुसरीकडे दीक्षाभूमी बंदोबस्तासाठी सीसीटीव्ही, क्यूआरटीची दोन, आरसीपीची तीन पथके आणि महिलापथक, बॉम्बशोध व नाशक पथक, डॉग स्कॉड आणि इतर पथक तैनात करण्यात आले आहे. या परिसराला पाच सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आले असून त्याला ४४ सीसीटीव्हींच्या माध्यमातून कव्हर करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील सर्वच हालचाली टिपल्या जाणार आहेत.
अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘यंदा धम्मचक्र प्रवर्तनासाठी ५ उपायुक्त, ६ सहाय्यक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, आणि ४० पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ७१ अधिकारी व ६०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. याखेरीज एसआरपीएफच्या दोन कंपन्यांचे एकूण १६० पोलिस कर्मचारीसुद्धा बंदोबस्तात कर्तव्यावर राहतील. त्यामुळे या परिसरात एकूण ८३१ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात असतील. याखेरीज शीघ्र कृती दल (क्युआरटी) व दंगल नियंत्रण पोलिस पथक (आरसीपी)सुद्धा या परिसरात तैनात राहणार आहे.’
Read Latest Maharashtra News And Marathi News