• Mon. Nov 25th, 2024

    Sambhajinagar News: शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका

    Sambhajinagar News: शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका

    छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होण्याची मालिका सुरूच आहे, त्याचा परिणाम म्हणून शहरात येणाऱ्या पाण्याची आवक घटली असून नागरिकांनी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळू लागले आहे. नवीन योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत पालिकेने जुन्या योजना काळजीपूर्वक चालवणे गरजेचे असताना कालबाह्य झालेल्या या योजनांमधील बिघाडामुळे पालिकेचे प्रशासन देखील हतबल झाले आहे.

    छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी येथील धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ५६ एमएलडी आणि १०० एमएलडी अशा दोन पाणीपुरवठा योजना उभारण्यात आल्या. आता या दोन्हीही योजना कालबाह्य झाल्या आहेत. पंपहाउसमधील वारंवार बिघडणारे पंप, पाण्याचा दाब वाढल्यानंतर फुटणाऱ्या जलवाहिन्या यामुळे पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातूनच केले जात आहे. या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत जुन्या दोन्हीही योजना पालिकेला चालवाव्या लागणार आहेत.

    दोन्हीही पाणी योजनेत वारंवार निर्माण होणाऱ्या बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. सिडको एन ५ च्या जलकुंभातील पंपहाउसमधील साठ अश्वशक्तीचा पंप आठ दिवस नादुरुस्त होता. त्यामुळे सिडको-हडको भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला आहे. आठ ते दहा दिवसांआड या भागात पाणीपुरवठा होऊ लागला आहे. या पंपाच्या दुरुस्तीचे काम होत असतानाच जायकवाडी येथील पंपहाउसमधील ४९० अश्वशक्तीचा एक पंप नादुरुस्त झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेला तीन दिवस झगडावे लागले आहे. हा पंप बिघडल्यामुळे जायकवाडी धरणातून उपया होणाऱ्या पाण्यात सुमारे दहा एमएलडी पाण्याची घट झाली. पालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के. पंडित यांनीच ही माहिती दिली आहे.
    जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी
    पंडित यांच्या माहितीनुसार ५६ एमएलडीच्या योजनेतून ३८ एमएलडी पाण्याचा उपसा जायकवाडी धरणातून होतो, तर १०० एमएलडीच्या योजनेतून ९० एमएलडीपर्यंत पाण्याचा उपसा केला जात आहे. दोन्हीही योजनांमधून १२८ ते १३० एमएलडी पाण्याचा उपसा होत असून छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी येईपर्यंत सुमारे ११० एमएलडी पाणीच मिळते, मिळणाऱ्या या पाण्यातून शहरात वितरण केले जाते. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार शहराचा विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता रोज किमान २६० एमएलडी पाण्याची गरज आहे. बिघाडांच्या सत्रामुळे केवळ ११० एमएलडी पाणीच उपलब्ध होत आहे. १५० एमएलडी पाण्याची तूट असून, नवीन योजना कार्यान्वीत होईपर्यंत ही तूट भरून निघणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *