• Sat. Sep 21st, 2024

सहा आमदारांना मिळायचा १६ लाखांचा हप्ता; नाशिक ड्रग्ज प्रकरणात संजय राऊत यांचा गंभीर आरोप

सहा आमदारांना मिळायचा १६ लाखांचा हप्ता; नाशिक ड्रग्ज प्रकरणात संजय राऊत यांचा गंभीर आरोप

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ड्रग्जप्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचा कागदच पोलिस सूत्रांनी मला दिला आहे. एका आमदाराला महिन्याला १६ लाखांचा हप्ता मिळतो हे पाहून मलाच धक्का बसला. अमली पदार्थांच्या व्यापारातून सहा आमदारांना हप्ते जात होते. त्यांची नावे लवकरच बाहेर येतील, असा सनसनाटी आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘ड्रग्ज’ तस्कर ललित पानपाटील याचा मित्रपरिवार विधानसभेपर्यंत आहे. या रॅकेटमध्ये आमदार, मंत्री आणि पोलिसदेखील आहेत, असा आरोप त्यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भरकटलेले आहेत. ते भांग पीत नसतील; पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. अशी जी माणसं आहेत, जी नशेच्या बाजारात फिरत आहेत. या नशेबाजांमुळे त्यांची मती गुंग झाली असल्याची टीका संजय राऊत यांनी शुक्रवारी केली आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे ड्रग्ज माफियांविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलतांना राऊत यांनी नाशिकमधील ड्रग्जप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. संशयित ललित पानपाटील हा ड्रग्ज प्रकरणातील हिमनगाचे टोक आहे. ड्रग्ज रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे. रॅकेट चालविण्यासाठी पोलिसांसह आमदार हप्ते घेत होते. ललित पाटील व मित्र परिवाराचे संबंध विधानसभेपर्यंत आहे. रॅकेटमध्ये आमदार सहभागी आहेत. मंत्री व पोलिसांवरदेखील आरोप आहेत. ज्यांना या प्रकरणात पकडले गेले ते फक्त मोहरे आहेत, असा खुलासाही त्यांनी केला आहे. ड्रग्ज रॅकेटमध्ये पिढी उद्ध्वस्त होत असताना राजकारण सुरू आहे. आजूबाजूला ड्रग्जमाफिया असल्याचे फडणवीस यांना माहीत नाही का? पैशांसाठी महाराष्ट्राचा नायजेरिया केला जात आहे. ड्रग्जच्या पैशांवर सरकारचा मोठा गट पोसला जात आहे. सर्व पोलिस अधिकाऱ्यांना २०२४ मध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागेल, असा दावा खासदार राऊत यांनी केला. उपसभापतींचा राजकारणाशी संबंध काय, असा सवाल नीलम गोऱ्हे यांना केला. तुम्ही एका वेगळ्या खुर्चीवर आहात. राजकीय विधाने करू शकत नाहीत. ड्रग्जवर बोलताना ड्रग्ज रॅकेटचे सदस्य आहात का, असा सवाल केला.

ड्रग्ज माफियांच्या पाठीशी शिक्षणाधिकारी

शिवसेनेचा मोर्चा निघू नये, यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊ नये यासाठी शिक्षकांनी शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दम भरला. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थांनी व विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभाग न होण्याचे परिपत्रक काढले होते. त्या अनुषंगाने राऊत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे ड्रग्जला समर्थन आहे का, असा सवाल केला. मोर्चाच्या माध्यमातून संस्था व विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करीत आहोत. मात्र, सरकारने पत्रक काढले, कलेक्टरकडे बैठकी झाल्या.

नांदगाव, मालेगाव कनेक्शन

सध्या पोलिसांकडून ज्या पानटपऱ्यांवर कारवाई झाली, तेथून हप्त्यांचे वितरण होत असल्याचा आरोप राऊत केला आहे. या हप्त्याची आकडेवारी पोलिसांकडून प्राप्त झाल्याचा, तसेच ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे नांदगाव, मालेगाव, इंदूर आणि गुजरात व पुढे गुजरातचे धागेदोरे अफगाणिस्तानपर्यंत असल्याचा दावाही त्यांनी केला.
तरुणांची मागणी, कारमध्ये हत्यारं अन् ५० लाखांची कमाई; ड्रग्ज माफिया प्रकरणात धक्कादायक उलगडा
फडणवीस भांग पीत नसतील

राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्फ्य केले. फडणवीसांकडे फारसे लक्ष देऊ नका. तेपण भरकटलेले आहेत. ते भांग पीत नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. अशी जी माणसं आहेत, जी नशेच्या बाजारात फिरत आहेत, त्या नशेबाजांमुळे त्यांची मती गुंग झाली असल्याची टीका राऊत यांनी केली. गृहमंत्र्यांकडे इतर सगळी माहिती असते; मात्र माफियांची माहिती नसते. इतर काही घटना घडली, की विरोधकांवर टीका करायची; मात्र हा महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे. ड्रग्ज गुजरातमधून येत आहे. गुजरातची बाजू घेत आहात की आमदारांची बाजू घेत आहात, असा सवालदेखील राऊत यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed