• Thu. Nov 14th, 2024

    सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांना संधी उपलब्ध करून द्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ

    ByMH LIVE NEWS

    Oct 20, 2023
    सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांना संधी उपलब्ध करून द्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ

    अमृत महाआवास अभियान ३ ग्रामीण अंतर्गतही पुरस्कारांचे वितरण

    कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : भारतात लोकसंख्येचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. समाजाचा, देशाचा विकास जलद गतीने करण्यासाठी मुलांना वाव दिल्यास तसेच महिलांना विविध ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्यास सर्वांगीण विकास साधने शक्य आहे असे प्रतिपादन पालकमंत्री असं मुश्रीफ यांनी केले.

    युनिसेफ आणि ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात एकमेव पंचायत समिती कागल अंतर्गत बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना विविध क्षेत्रात दिलेले आरक्षण असेल, या प्रकारच्या पथदर्शी कार्यक्रमातून मुलांना मिळालेले त्यांचे  अधिकार असतील यातून मोठ्या प्रमाणात कुटुंबात, समाजात तसेच देशात सकारात्मक बदल झाल्याचे या प्रकल्पावरून निदर्शनास आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकास्तरीय बाल स्नेही, बालपंचायत, उत्कृष्ट प्रेरक, उत्कृष्ट महिला सभा व अमृत महाआवास योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या ग्रामपंचायत तसेच घरकुल प्रमुखांचा पुरस्कार देवून सन्मान व सत्कार करण्यात आला. बालकांच्या नजरेतून गावाकडे पाहताना बालसंवाद या पुस्तकाचे विमोचन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक,  प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, गट विकास अधिकारी सुशील संसारे तसेच सरपंच, ग्रामसेवक, प्रेरक, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    लोकशाहीचे प्रशिक्षणच जणूकाही या पथदर्शी प्रकल्पातून दिले जाते – खासदार संजय मंडलिक

    मुलांनाही हक्क आहेत, मुलांनाही लोकशाहीनुसार अधिकार प्राप्त झालेला आहेत, या प्रकल्पातून स्त्रीशक्ती वाढेल असे सांगून जणूकाही या बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत कार्यक्रमातून लोकशाहीचे प्रशिक्षणच दिले जाते असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. आर्थिक दृष्ट्या मागास घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी माननीय पंतप्रधानांनी अशा अनेक योजना देशात राबवण्यास सुरुवात केली आहे. कागल तालुक्यात हा प्रकल्प यशस्वीपणे राबवल्यामुळे तो राज्य व देशात राबवण्यास मार्गदर्शक ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

    मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेली बालसंवाद पुस्तिका चांगल्या प्रकारे मुलांना व पालकांना मदत करेल असे बोलुन कागल तालुका सर्व ग्रामीण योजनांतून सर्वांगीण विकास साधेल असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी केले तर आभार अमोल पाटील यांनी मानले.

    विविध पुरस्कारांचे वितरण

    युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत कार्यक्रमांतर्गत कागल तालुक्यातील विविध ग्रामपंचायती व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रेरकांचा सन्मान तसेच अमृत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

    यात तालुकास्तरीय उत्कृष्ट बालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कार प्रथम क्रमांक ग्रामपंचायत अर्जुनी, द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत व्हन्नुर, तृतीय क्रमांक ग्रामपंचायत भडगाव यांना वितरित करण्यात आला. तालुकास्तरीय उत्कृष्ट प्रेरक पुरस्कार आरती माने दौलतवाडी, अनिल उन्हाळे अर्जुनी, खंडू जाधव हासुर खुर्द यांना वितरित करण्यात आला. तालुका स्तरीय उत्कृष्ट बालपंचायत पुरस्कार समृद्धी परीट कापशी, श्रेयस कांबळे करनूर, अनुष्का सुतार अर्जुनी यांना देण्यात आला. तसेच तालुकास्तरीय उत्कृष्ट महिला सभा पुरस्कार ग्रामपंचायत अर्जुनी प्रथम, द्वितीय व्हन्नूर तर तृतीय भडगाव ग्रामपंचायतीला देण्यात आला.

    अमृत महाआवास अभियान 3 ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामपंचायत पुरस्कार बेलवळे खुर्द प्रथम क्रमांक, पिराचीवाडी द्वितीय क्रमांक, चिखली ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक देण्यात आला. प्रधानमंत्री आवास सर्वोत्कृष्ट घरकुल यामध्ये चिखली मधील विलास कांबळे प्रथम क्रमांक, निढोरी ग्रामपंचायतमधील अक्काताई कांबळे द्वितीय क्रमांक, बेलवळे बुद्रुक मधील सरस्वती पाटील यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार ठाणेवाडी मधील अनुसया घोटणे, हमिदवाडा ग्रामपंचायतमधील वैभव गंदुगडे व बोरवडे ग्रामपंचायत मधील सुखदेव डाफळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अटल बांधकाम मधून पुरस्कार देण्यात आला.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed