कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण भूसंपादनाअभावी रखडले आहे. मूळ प्रस्तावानुसार हा रस्ता ८४ मीटर रूंद होता. मात्र, भूसंपादनासाठी लागणारा खर्च वाढत असल्यामुळे महापालिकेने आता या रस्त्याची रुंदी ५० मीटरच करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला रस्त्याच्या भूसंपादनासाठी २८० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित ८० कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे.
पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच जिल्हा आढावा बैठकीमध्ये कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला होता. भूसंपादन वेगाने व्हावे, याबाबत पवार यांनी महापालिका प्रशासनाला सूचनाही केल्या. दीड महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनीही या रस्त्याचे काम आणि भूसंपादनासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली होती. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या रस्त्याला भेट देत पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या होत्या; तसेच अतिरिक्त वाहतूक वॉर्डनही उपलब्ध करून दिले होते.
यानंतर दीड महिन्यामध्ये अडीच हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले. सात मिळकतधारकांकडून हे संपादन करण्यात आले आहे. अद्याप १३८ मिळकतींचे संपादन बाकी आहे. भूसंपादनासंदर्भात या जागामालकांशी चर्चा सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रोख मोबदला हीच अडचण
कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात भूसंपादन हीच प्रमुख अडचण आहे. येथील बहुसंख्य जागामालक रोख मोबदल्यासाठीच अडून बसले आहेत. महापालिकेने टीडीआर, एफएसआय व अन्य पर्यायांची तयारी दर्शवली आहे. मात्र, भूसंपादनाचे गाडे रोख मोबदल्यावरच अडल्याचे चित्र आहे.
जड वाहतूक थांबवण्याचा प्रस्ताव
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला वेळ लागणार आहे. मात्र, या रस्त्यावर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका; तसेच वाहतूक पोलिस विविध पर्यायांचा विचार करत आहे. यातूनच गर्दीच्या वेळी या रस्त्यावरून होणारी जड वाहतूक थांबविण्याचा पर्यायही पुढे आला असून, तशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
पालकमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीतही चर्चा झाली. या रस्त्यावर मोठ्या सोसायट्या, शाळा, मंगल कार्यालय, बँका, मंदिरे, रुग्णालय, कात्रज डेअरी असल्याने या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे विशेषतः सकाळी-सायंकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी येथे कोंडी होते. तसेच, काही अपघातही झाले आहेत. त्यामुळे या बैठकीमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत जड वाहनांवर बंदी घालण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानुसार सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास जड वाहनांना बंदी करण्याची सूचना पालकमंत्र्यांनीच प्रशासनाला दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश काढण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.