या प्रकरणातील मृत कमलाकर पवनकर हा आरोपी विवेक पालटकरचा मेहुणा होता. पालटकरची त्याच्या पत्नीच्या हत्येतील प्रकरणातून उच्च न्यायालयाने सुटका केली होती. पुढे कमलाकर आणि विवेक यांच्यात संपतीच्या हिस्स्या-वाट्यावरून वाद झाले. १० जून २०१८ रोजी रात्री ९.३० ते १० वाजतादरम्यान विवेक हा कमलाकर यांच्या घरी रात्रीच्या मुक्कामाने आला. सर्वजण झोपलेले असताना विवेकने रात्री तीन वाजताच्या सुमारास लोखंडी सब्बलने एकापाठोपाठ एक घरातील पाच सदस्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केली. मृतांमध्ये कमलाकर पवनकर, त्यांच्या पत्नी अर्चना, आई मीराबाई, मुलगी वेदांती (१२) व विवेक याचा मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश पालटकर याचाही समावेश होता. सत्र न्यायालयाने १५ एप्रिल रोजी न्यायालयाने विवेकला फाशीची शिक्षा सुनावली. ती कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात राज्य सरकारने केली असून ती रद्द करावी असे अपील विवेकने दाखल केले आहे.
याप्रकरणी गुरुवारी न्या. विनय जोशी आणि न्या. महेंद्र चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोषीला सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर करावे लागते. तसे आदेश न्यायालयाने गेल्या यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान दिले होते. मात्र, तो सध्या येरवडा कारागृहात असून त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला न्यायालयात हजर करणे धोक्याचे सुद्धा ठरू शकते. त्यामुळे त्याला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करण्याची परवानगी कारागृह प्रशासनाने मागितली होती, अशी माहिती या प्रकरणातील अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी दिली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली. याशिवाय विवेकच्या अपीलावर आणि शिक्षा कायम ठेवण्यासाठीच्या राज्य सरकारच्या अर्जवर एकत्रितपणे २५ ऑक्टोबरपासून संयुक्त सुनावणी होईल, असेही आदेश न्यायालयाने दिले. आरोपी विवेकच्या वतीने बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने विधी सेवा प्राधिकरणामार्फत अॅड. देवेंद्र चौहान यांनी नियुक्ती केली आहे.