• Sat. Sep 21st, 2024

सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ByMH LIVE NEWS

Oct 18, 2023
सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १८ : स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक गरज लक्षात घेऊन सहकारी बँकांची सुरुवात करण्यात आली. या वित्तीय संस्थांनी लोकांचा विश्वास संपादन केला. सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्वाचे असून अशा भावनेतून काम करणारी संस्था मोठी होते, याचेच उत्तम उदाहरण जनता सहकारी बँक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित जनता सहकारी बँक लि. पुणेच्या अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भूषण स्वामी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, समाजाचा विचार करून राष्ट्रीय भावनेने काम करणारे कार्यकर्ते जोडले गेल्याने पुणे जनता सहकारी बँकेने चांगली प्रगती केली आहे.  ज्या काळात बँकेचे विलीनीकरण करणे कठीण होते अशा वेळी लोकांचा सहकार क्षेत्रावर विश्वास रहावा म्हणून बँकांचे विलीनीकरण करून जनता बँकेने मल्टी स्टेट बँकेचा दर्जा मिळविण्यासोबत राज्यातही अनेक शाखांच्या रुपाने आपला विस्तार केला आहे.

बँकेच्या आर्थिक प्रगतीसोबत त्या-त्या काळातील आव्हानांना स्वीकारून, सोबत घेऊन पुढे जाणारी संस्था मोठी होते. जनता बँकेने  वेळेत कोअर बँकीग सोल्युशन्स अंगीकारून डेटा सेंटर सुरू केली. सर्व प्रकारच्या आधुनिकीकरणाची सुरुवात योग्यवेळी करणाऱ्या बँकामध्ये जनता सहकारी बँक अग्रणी आहे. या बँकेने इतरही  संस्थांना यादृष्टीने तयारी करण्यास मदत केली. सहकाराच्या क्षेत्रात एकमेकाला सोबत घेऊन पुढे गेल्यास आर्थिक प्रगती होते, हे बँकेने दाखवून दिले आहे. सामान्य माणसाला सहकारी बँक आपली  वाटते. सामान्य माणसाशी असणारे जिव्हाळ्याचे नाते हे सहकारी बँकांचे वैशिष्ट्य असल्यानेच व्यावसायिक आणि राष्ट्रीय बँका स्पर्धेत येऊनही सहकारी बँकांवरचा जनतेचा विश्वास वाढतो आहे. यातूनच बँकांची प्रगती होऊन आर्थिक क्षेत्रात क्रांती करता येते.

सामाजिक आणि आर्थिक प्रगतीशिवाय देश पुढे जात नाही. आर्थिक प्रगतीसाठी वित्तीय संस्थांचे जाळे मजबूत होणे महत्त्वाचे आहे. उद्योग व्यवसायाला वित्तीय संस्थांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याशिवाय विकास होत नाही. त्याचवेळी वित्त पुरवठ्यासोबत विश्वासार्हता महत्वाची आहे. सहकार क्षेत्रात गैरप्रकार आढळल्यास नागरिकांच्या मनात भय निर्माण होते आणि चांगल्या संस्थांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. म्हणून या क्षेत्रात प्रत्येकाने विश्वस्तांच्या भावनेने काम करावे, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा आर्थिक विकास वेगाने होत असल्याचे नमूद करून ते म्हणाले, देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत असताना अनेक उद्योग भारताकडे आकृष्ट होत आहेत. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत वित्तीय संस्थांची जबाबदारी वाढणार आहे. बँकिंग सेवा डिजिटल व्यवस्थेशी जोडावी लागेल. डिजिटल मार्केटचा लाभ घेण्यासाठी त्याच्याशी समरस होणाऱ्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. ग्राहकांच्या प्रति असलेली कटीबद्धता कायम ठेवून आधुनिकीकरण स्वीकारल्यास अधिक वेगाने प्रगती होईल, असे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, पुणे जनता सहकारी बँकेने अडचणीत असताना उद्योगांना सहकार्य केले. सहकारी क्षेत्रातील बँकांमुळे सर्वसामान्य माणसाला गरजेच्यावेळी आर्थिक सहाय्य मिळते. राज्यात सर्वसामान्य माणसाला व्यवसाय सुरू करण्यास सहकारी बँकांनी मदत केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ७० हजार युवक-युवतींना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासोबत इतरांनाही रोजगार देता आला. नव्याने स्वत:चा रोजगार उभा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना बँकेकडून असणारी अपेक्षा जनता सहकारी बँक पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात लहान स्वरूपातील कर्ज देण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी भूषण स्वामी आणि श्री.हेजीब यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.कश्यप यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि अमृत महोत्सवी वर्षाविषयी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि गरुडझेप अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बँकेचे कर्मचारी प्रसाद जोशी यांनी तयार केलेल्या कॉफीटेबल बुकचे उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बँकेचे खातेदार अशोक अळवणी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed