हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने राज्यभरात या गुन्ह्याच्या तपासाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या प्रकरणाचा सूत्रधार असलेला ललित पाटील याच्या देहबोलीत कोणताही तणाव जाणवत नव्हता. रुग्णालयात जाण्यासाठी गाडीत बसताना ललितने प्रथम, ‘मी पत्रकारांशी बोलीन’, असे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांच्या गाडीने वेग पकडल्याने त्याला फार बोलता आले नाही. यानंतर ललित पाटीलला रुग्णालयात आणल्यानंतर त्याने पुन्हा प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच बोलायला सुरुवात केली.
मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं आहे. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगेन, असे ललित पाटीलने म्हटले. त्यानंतर पोलिसांनी ललित पाटीलला लगेच रुग्णालयात नेले. मात्र, ललित पाटीलच्या या वक्तव्यामुळे नव्या वादामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ललित पाटील याला रुग्णालयातून पळवण्यात कोणाचा हात होता? त्याला राजकीय संरक्षण होते का? याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
आमच्या मुलाचा एन्काऊंटर करु नका; ललित पाटीलच्या आई-वडिलांनी फोडला टाहो
ललित पाटील याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचा एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे. या दोघांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ‘आमच्या मुलावर कारवाई करा, पण त्याचा एन्काऊंटर करु नका’, अशी आर्त मागणी केली. राजकीय नेत्यांनी तुमच्या मुलाचा एन्काऊंटर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आम्हाला ललितचा एन्काऊंटर करण्याची भीती वाटते, असे ललित पाटीलच्या पालकांनी सांगितले.
