• Thu. Sep 10th, 2026

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना उद्योग व बाजारपेठेशी जोडण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणार – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई दि. ९ : विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत राज्याची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर व स्टार्टअपसाठी राज्यस्तरीय धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

यासंदर्भात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या माध्यमातून कार्यरत व प्रस्तावित इन्क्युबेशन यंत्रणा, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन, संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि स्टार्टअप निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र‍शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि नवउद्योजक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून महाराष्ट्रातील युवा शक्ती आणि नवकल्पनांना उद्योगाभिमुख दिशा देण्याचे प्रयत्न या धोरणातून करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम इन्क्युबेशन परिसंस्था निर्माण झाल्यास राज्यात मोठ्या प्रमाणावर नवउद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच महाराष्ट्राला देशातील आघाडीचे स्टार्टअप हब बनविण्याच्या उद्दिष्टाला बळ देणारे हे राज्यस्तरीय धोरण ठरणार असून, युवा नवकल्पकांना संशोधनापासून उद्योगनिर्मितीपर्यंत आवश्यक सर्व प्रकारचे पाठबळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे ही, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि संशोधन केवळ शैक्षणिक स्तरापुरते मर्यादित न राहता त्यांचे व्यवसाय, स्टार्टअप आणि उद्योगांमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आवश्यक मार्गदर्शन, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगांशी समन्वय आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध करून देण्यावर मंत्री पाटील यांनी भर दिला. तसेच विद्यापीठांमध्ये सक्षम आणि परिणामकारक इन्क्युबेशन व्यवस्था उभारून नवीन उद्योजक घडविणे, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि नवउद्योगांना बाजारपेठेशी जोडणे, या उद्देशाने राज्यस्तरीय धोरणाची रूपरेषा अधिक प्रभावी करण्याबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed