• Tue. Nov 26th, 2024
    अश्लील शिवीगाळ केल्याने पुण्यात जिवलग मित्राला संपवलं, मृतदेह गोधडीत गुंडाळून ठेवला; पण…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : अश्लील शिवीगाळ केल्याचा राग आल्याने दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या जिवलग मित्राचा चाकूने गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर मित्राचा मृतदेह नाल्यात फेकून देऊन दोघेही मित्र काही झालेच नाही अशा आविर्भावात फिरू लागले. दरम्यान, मृत मित्राच्या पत्नीने नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत देताच दोघे मित्र पळून गेले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघांना अटक केली.

    पंकज रतन पाचपिंडे (वय २८, रा. थेरगाव), अमरदीप उर्फ लखन दशरथ जोगदंड (वय ३३, रा. थेरगाव गावठाण, मूळ अंबाजोगाई, परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरज उर्फ जंजीर कांबळे (वय ३०, रा. थेरगाव) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे.

    Lalit Patil: कारवाई करा, पण आमच्या मुलाचा एन्काऊंटर करु नका; ललित पाटीलच्या आई-वडिलांनी फोडला टाहो
    पोलिस उपायुक्त डॉ काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कांबळे यांच्या पत्नी आरती कांबळे यांनी सात ऑक्टोबरला सुरज बेपत्ता असल्याची तक्रार केली. सुरुवातीला पोलिसांना सुरजचा शोध लागला नाही. दरम्यान, ११ ऑक्टोबरला आरती कांबळे यांनी पुरवणी जबाब दिला. त्यामध्ये पती सुरज हा मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड यांच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी आला नसल्याचे सांगितले.

    पोलिसांनी पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड यांच्याकडे चौकशी करण्यासाठी त्यांचा शोध घेतला असता तेदेखील कोठेतरी निघून गेल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधला असता दोघेही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी अंबाजोगाई येथून दोघांना ताब्यात घेतले.

    मृतदेह गोधडीत गुंडाळून ठेवला

    पंकज चालवत असलेल्या तीन चाकी टेम्पोमध्ये आरोपींनी सुरजचा मृतदेह एका गोधडीत गुंडाळून ठेवला. टेम्पो बावधन येथे नेऊन गायकवाड वस्ती येथील महामार्गाखालून वाहणाऱ्या नाल्यात त्यांनी मृतदेह टाकून दिला होता.

    जबाबामुळे तपासाला दिशा

    सुरज कांबळे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने सात ऑक्टोबरला दिल्याचे आरोपींना समजले. त्यानंतर आरोपींनी आरती यांची त्यांच्या घरी भेट घेतली. पाच ऑक्टोबरला आम्ही सुरजसोबत दारू प्यायलो. त्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास सुरज घरी परत गेल्याचे आरोपींनी आरती यांना सांगितले होते. त्यानंतर पोलिस चौकशीच्या भीतीने दोघे आठ ऑक्टोबरला फरारी झाले होते. या प्रकरणात सुरज यांच्या पत्नीने दिलेल्या पुरवणी जबाबामुळे पोलिस तपासाला दिशा मिळाली.

    कोण आहेत या काँग्रेस नेत्या दिव्या मारुंथैया? ज्यांना पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकावा अशी आहे इच्छा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed