सन १८७३मध्ये उभे राहिलेले मुंबई बंदर आणि १९८९मध्ये तयार झालेले जवाहरलाल नेहरू बंदर, यांच्या विस्ताराला आता फार वाव नाही. त्याचवेळी देशात सर्वाधिक माल आयात ही पश्चिमेकडून होते. त्यासाठी अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या बंदराची निकड लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे ‘वाढवण’ला सहा किलोमीटर खोल समुद्रात या बंदराचे नियोजन करण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणांतर्गत ‘वाढवण बंदर’ या विशेष कंपनीकडे बंदर उभारणची जबाबदारी आहे. त्या अंतर्गतच एकीकडे पर्यावरण व मच्छिमारांचा अभ्यास सुरू असताना, जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘जेएनपीए’ने विशेष सामंजस्य करार करून या बंदर उभारणीच्या दृष्टीने मंगळवारी महात्त्वाचे पाऊल टाकले.
‘वाढवण’साठी ‘जेएनपीए’ने एकूण तीन सामंजस्य करार केले आहेत. हे तीनही करार बंदरातील टर्मिनल उभारणीसंबंधी आहेत. त्यामध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक बेल्जियम येथील ‘आयएसडीपीएल’ ही कंपनी करणार आहे. दुबईतील ‘डी पी वर्ल्ड’ ही आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपनी व ‘जे.एम. बक्षी’ ही बंदर क्षेत्रातील मोठी कंपनी प्रत्येकी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अशाप्रकारे एकूण ६१ हजार कोटी रुपयांच्या टर्मिनल उभारणीसाठीचे हे तीन करार ‘जेएनपीए’चे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते तीनही कंपन्यांशी मंगळवारी करण्यात आले.
वाढवण बंदर आकड्यांत
एकूण क्षेत्र : १८० चौरस किमी
टर्मिनल व बंदर : ३० चौरस किमी
समुद्री सवंर्धन व अन्य सुविधा : १५० चौरस किमी
क्षेत्र : डहाणू किनारपट्टीपासून ६ किमी खोल समुद्रात
एकूण टर्मिनल : ९
लाटांच्या क्षेत्रात किनारपट्टी संरक्षण : १४४८ हेक्टर
क्षमता : २.४० कोटी कंटेनर हाताळणी