• Sun. Sep 22nd, 2024

उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ByMH LIVE NEWS

Oct 16, 2023
उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सोलापूर दि-१६ (जिमाका) :-उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे.  त्याअनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजना बाबत चर्चा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, उजनी धरण जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. उजनी धरणातून जिल्ह्यात सिंचनासाठी तसेच सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडले जाते. यावर्षी उजनी धरणातील पाणी पातळी ६०.६६ टक्के असल्याने उपलब्ध पाण्याबाबत सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे. धरण परिसरातील अनधिकृत पाण्याचा उपसा होणार नाही याबाबत जलसंपदा विभागाने दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कालवा सल्लागार समितीची बैठक दिनांक २५ किंवा २६ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

उजनी धरणात आज रोजी उपयुक्त पाणीसाठा ६०.६६ टक्के(32.50 TMC) इतका असून या प्रकल्पावर सीना माढा उपसा सिंचन योजना, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव सिंचन योजना तसेच चार मोठे प्रकल्प, सात मध्यम प्रकल्प, ५६ लघु प्रकल्प व 90 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.  या प्रकल्पातून उपलब्ध पाण्याचे  नियोजन करण्यात आले असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed