कोल्हापुरातून या आधी कोल्हापुर मुंबई विमानसेवा ही आठवड्यात मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार हे चार दिवस सुरु होती. मात्र, कोल्हापूर व परिसरातून सध्या कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वे, एसटी व खासगी वाहनांना लागणारा वेळ पाहता कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानसेवा सुरु व्हावी अशी मागणी उद्योजक आणि व्यापारी वर्गातून होत होती. ही मागणी लक्षात घेता खा. धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा करत ही सेवा दररोज सुरू व्हावी अशी मागणी लावून धरली होती. आता या मागणीला यश आले आहे. आज पासून कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर या मार्गांवर दैनंदिन विमानसेवा सुरू झाली आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय झाली आहे.
असे आहे वेळापत्रक:
दरम्यान स्टार एअरकडून विमान सेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही विमानसेवा बंगळुरु ते मुंबई व्हाया कोल्हापूर अशी असणार आहे. बंगळुरुहून सकाळी ९: ०५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल आणि १० : २० मिनिटांनी ते कोल्हापुरात पोहचेल. तर सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून हे विमान मुंबईसाठी उड्डाण करेल आणि मुंबईत ११ : ५० ला पोहचणार आहे. तसेच मुंबईतून दुपारी ३ :४० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरसाठी निघेल आणि कोल्हापुरात ते ४ : ४० वाजता पोहचेल व ५ : १० मिनिटांनी ते बंगळुरुसाठी रवाना होणार आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळ येथे सुरू असलेल्या नवीन टर्मिनलचे कामाची पाहणी केली. तसेच हे टर्मिनल लवकरच सुरू होईल असे महाडिक यांनी सांगितले आहेत.
Read Latest Kolhapur News And Marathi News