• Mon. Nov 25th, 2024

    अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारांविरोधात धाडसत्र; सहकार विभागाच्या कारवाईने खळबळ

    अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारांविरोधात धाडसत्र; सहकार विभागाच्या कारवाईने खळबळ

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: सहकार विभागाने जिल्ह्यात अवैध सावकारांविरोधात धाडसत्र राबविले. दोन तालुक्यांतील कारवायांत महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    अवैध सावकारीविरुद्ध सहकार विभागाने निर्देश दिल्यानंतर धाडसत्र राबविले जात आहे. अमरावती जिल्ह्यातूनही तक्रारी वाढू लागताच सहभाग विभागाच्या पथकाने मोर्शी व धामणगाव तालुक्यात कारवाई केली. सहभाग विभागाचे उपनिबंधक शंकर कुंभार यांनी यासंबंधीचे आदेश दिले होते. यानंतर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील विनोद देशमुख यांच्या घरी कागदपत्रांची तपासणी केली. त्यांच्या घरासोबतच दुकानात व संबंधित दवाखान्यात धाड टाकली. या कारवाईत तीन पथके सहभागी झाली होती. शुक्रवारी झालेली ही कारवाई तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे. मोर्शी येथील राधाकृष्ण कॉलनी निवासी अरविंद गेडाम यांच्याकडेदेखील कारवाई करण्यात आली. दोन्ही कारवायांदरम्यान खरेदी खत, मुद्रांक, शेती कारनामा आदी महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

    ३७ तक्रारी प्रलंबित

    अवैध सावकारीप्रकरणात सहकार विभागाने शुक्रवारी धाड टाकून आणखी काही प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. अवैध सावकारीसंदर्भात ३७ तक्रारी सहकार विभागाकडे आहेत. या तक्रारींची पडताळणी केली जात आहे. याशिवाय १८/२ अंतर्गत दहा प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांची पडताळणी केली जात असून सत्यता आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सहकार विभागाचे सुधीर मानकर यांनी सांगितले आहे.
    सुसंस्कृत पुणे तस्करीचे केंद्र; दहा महिन्यांत १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, राजकीय वरदहस्त कोणाचा?
    उत्सवामुळे विलंब

    सहकार विभाग अवैध सावकारीप्रकरणात कारवाई करण्यास तयार आहे. परंतु यासाठी पोलिस बंदोबस्त आवश्यक आहे. नुकताच श्री गणेशोत्सव पार पडला. याशिवाय आगामी नवरात्रोत्सव असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवानंतत धाडसत्र राबविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *