• Sat. Sep 21st, 2024

पंतप्रधान ग्रामसडक योजनेमुळे जोडली ४६६ खेडी; नाशिक जिल्ह्यात १,३६० किमी लांबीचे रस्ते

पंतप्रधान ग्रामसडक योजनेमुळे जोडली ४६६ खेडी; नाशिक जिल्ह्यात १,३६० किमी लांबीचे रस्ते

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : पंतप्रधान ग्रामसडक योजनेमुळे नव्याने उभारण्यात आलेल्या २२८ आणि दर्जोन्नती केलेल्या २४ अशा एकूण २५२ रस्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील तब्बल ४६६ खेडी एकमेकांना जोडण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही कामगिरी करण्यासाठी प्रशासनाला तब्बल दोन दशकांचा कालावधी लागला.

डिसेंबर २००० पासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला. या टप्प्यात बिगर आदिवासी क्षेत्रात ५०० लोकसंख्येवरील व आदिवासी क्षेत्रात २५० लोकसंख्येवरील वाडे, पाडे, वस्ती व गावे जोडण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले होते. या टप्प्यात नाशिक जिल्ह्याकरिता २२८ रस्त्यांच्या कामास मंजुरी होती. या रस्त्यांची लांबी १,२२२ किमी इतकी होती. पहिल्या टप्प्यातील या रस्त्यांमुळे जिल्ह्यातील ३९९ खेडी जोडली गेली. या रस्त्यांच्या कामासाठी ३२९.३२ कोटी रुपये इतका निधी खर्च झाला.

सन २०१३ मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला. या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील २४ रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्याचे उद्दिष्ट होते. या टप्प्यात १३८ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे होऊन ६७ खेडी एकमेकांना जोडली गेली. या कामांवर ८४.०१ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला.

सध्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला असून, या टप्प्यात ग्रामीण कृषी बाजारपेठांना जोडणाऱ्या तसेच शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या दर्जोन्नती व सुधारणा करण्याच्या कामांचा समावेश आहे.

…असा आहे तिसरा टप्पा

– २०१९-२० मध्ये ४२४ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामाचे उद्दिष्ट
– २०२०-२१ मध्ये एकूण १८ कामांच्या १२९.०६ किमी लांबीच्या रस्तेकामांना मंजुरी
– २०२२-२३ मध्ये एकूण ३७ कामांच्या २०८.५३ किमी लांबीच्या रस्तेकामांना मंजुरी
– ८६.३८ किमी लांबीचे रस्ते प्रस्तावित आहेत
– या टप्प्यात कमांसाठी २३८.१७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी
– यापैकी १४ कामांवर ५६.१२ कोटींचा निधी खर्च
क्लिक करा आणि बुक करा! घरबसल्या आता पाठवता येणार पार्सल, काय आहे टपाल विभागाची नवी योजना?
योजनेची टप्पानिहाय प्रगती
टप्पा क्र. – एकूण कामे – लांबी किमी – जोडलेली खेडी – खर्च (कोटी रुपयांमध्ये)
१ – २२८ – १,२२२ – ३९९ – ३२९.३२
२ – २४ – १३८ – ६७ – ८४.०१
एकूण – २५२ – १,३६० – ४६६ – ४१३.३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed