• Mon. Nov 25th, 2024

    ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ल्यांवर फिरायला जाताय? सावधान, मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या गोष्टी टाळा

    ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ल्यांवर फिरायला जाताय? सावधान, मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या गोष्टी टाळा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये मधमाशांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तूच्या आवारात भटंकती करताना गोंगाट करणे, सिगारेट ओढणे, मधमाश्यांना डिवचण्यासह अतिधाडस पर्यटकांच्या जीवावर बेतते आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राजगडावर दोन दिवसांपूर्वी नऊ पर्यटकांवर झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामागे एकाने वापरलेले उग्रवासाचे सुगंधित द्रव्य (डिओड्रंट) कारणीभूत ठरले.

    गडकिल्ल्यांवरील अतिउत्साही पर्यटकांची वाढती संख्या, बेशिस्त पर्यटन अपघातांना निमंत्रण देत आहे. पावसाळ्यात जलाशय ओलांडताना, धुक्यात पायवाटेचा अंदाज आला नाही म्हणून दर वर्षी अपघात होतात. यंदा तर उन्हाळ्यापासून सुरू झालेले मधमाशांचे हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. पुण्यासह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या नऊ महिन्यात २५पेक्षा अधिक मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना झाल्या असून, यात सुमारे शंभर पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनांमागे प्रामुख्याने पर्यटकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उपद्रव कारणीभूत असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.

    गडकिल्ल्यांबरोबरच जुनी मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, लेण्यांमध्ये वर्षानुवर्षे मधमांशांची मोठी पोळी आहेत. पर्यटकांनी त्यांना त्रास दिला नाही, तर या माशा हल्ला करीत नाहीत. पण पोळ्यांजवळ चूल पेटविणे, सिगारेट ओढणे आणि गोंगाटामुळे मधमाशा आक्रमक होत आहेत. प्रामुख्याने राजगड, वेल्हे, भोर, जुन्नर, लोणावळा, नाशिकलगतचे किल्ले, औरंगाबाद या भागात मधमाश्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

    राजगडावर सोमवारीही हल्ला

    सुवेळा माचीजवळ, नेढ्याच्या आवारात मधमाशांची मोठी पोळी आहेत. सध्या गडावर रानफुले बहरल्याने मधमाशा सक्रिय आहेत. राजगडावर रविवारी नऊ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यातील एकाने घामाचा वास टाळण्यासाठी सुगंधी द्रव्य अंगावर फवारले होते. सुगंधी द्रव्याच्या वासामुळे मधमाशा पर्यटकांच्या दिशेने धावल्या. दुसऱ्या दिवशीही मधमाशांनी काहींवर हल्ला केला. त्यानंतर आम्ही पर्यटकांना माचीकडे जाऊ दिले नाही. धोक्याची सूचना देऊनही अनेक पर्यटक दुर्लक्ष करीत असल्याचा अनुभव आहे. मधमाशी प्रवण क्षेत्रात मोठे सूचनाफलक लावण्याच्या मागणीचे निवेदन मी वरिष्ठांना पाठवले आहे, असे राजगडावरील पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे यांनी सांगितले.

    का होतात हल्ले

    – उन्हाळ्यात, रानफुले बहरली की मधमाशा सक्रीय असतात
    – या काळात पोळ्याजवळ शेकोटी, चूल पेटवणे
    – पोळ्यांच्या परिसरात गोंगाट करणे, मोबाईलवर जोरात गाणी लावणे
    – पोळ्याजवळ जाऊन सेल्फीस्टिकने फोटो काढणे
    – मधमाश्यांना दगड मारून डिवचणे
    – पोळ्याजवळ सिगारेट ओढल्याने
    – अंगावर सुगंधी क्रीम, परफ्यूम वापरणे, भडक रंगाचे कपडे घालणे टाळा

    राजगडावर अभिषेक गोळे या तरुणाने मोठे धाडस दाखवून पर्यटकांना वाचवले. या संबंधित पर्यटकांनी गडावर जाण्यापूर्वी गावात कोणालाही माहिती दिलेली नव्हती. त्यांना मदतीसाठी गावकऱ्यांशी संपर्क साधता आला नाही. या दुर्दैवी घटनेतून यापुढे इतर पर्यटकांनी धडा घेतला पाहिजे. कोणत्याही साहसी मोहीमेला जाण्यापूर्वी तेथील माहिती जाणून घेणे, गावातील वाटाड्याला बरोबर नेणे, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.- ओंकार ओक, गिर्यारोहक, बचाव पथक समन्वयक
    ड्रग्ज म्हणजे नेमकं काय? कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन अधिक? लक्षणं आणि दुष्परिणाम जाणून घ्या सविस्तर
    प्रमुख घटना
    सिंहगड : (मे) सांबरेवाडी मंदिरात जाणाऱ्या दहा पर्यटकांवर हल्ला , सर्व सदस्य बेशुद्ध पडले, (जून) हल्ल्यात चार पर्यटक जखमी.
    राजगड (एप्रिल) : चार पर्यटकांवर हल्ला, किरकोळ जखमी (ऑक्टोबर)नऊ पर्यटकांवर हल्ला, गंभीर जखमी.
    चंद्रपूर (एप्रिल) : सात बहिणांचा डोंगर परिसरात फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू पाच जखमी, (जून) त्याच डोंगरावर मधमाशांच्या हल्ल्यात २५ पर्यटक गंभीर जखमी.
    छत्रपती संभाजीनगर (एप्रिल) : अजिंठा लेणीत वीस पर्यटक आणि सहा कर्मचाऱ्यांवर मधमाशांचा हल्ला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed