– सरासरी उत्पादन कमी
कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणीत पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा वरुणराजाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग व उडीदाच्या पेरणीला फटका बसला. मुगाची पेरणी सरासरीच्या ५४ टक्क्यांनी घटली, तर उडदाची पेरणी सरासरीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी कमी झाली. परिणामी, यंदा मुगाचे उत्पादन ६० हजार टन होण्याचा कयास असून, सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन ६६ टक्क्यांनी कमी आहे.
– उडीद उत्पादनात घट?
उडदाचे गेल्या वर्षी दोन लाख २६ हजार टन उत्पादन झाले होते. ते यंदा ८७ हजार टनांवर घसरण्याची शक्यता असून, सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये ५० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. तूरडाळ उत्पादनात ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. तुरीची लागवड ११ लाख १३ हजार हेक्टरवर झाली असून, आठ लाख ७६ हजार टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी तुरीचे नऊ लाख २६ हजार टन उत्पादन झाले होते.
– ज्वारी, बाजरीत मोठी घट
खरीप हंगामातील ज्वारीचे उत्पादन ९१ हजार टन अपेक्षित असून, पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ६७ टक्क्यांनी, तर बाजरीचे उत्पादन दोन लाख टन अंदाजित असून, पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ६६ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. मक्याच्या उत्पादनातही सरासरीच्या तुलनेत ४१ टक्क्यांची घट होईल असा अंदाज आहे. यंदा मक्याचे उत्पादन १३ लाख ५८ हजार टन होण्याचा अंदाज असून, गेल्या वर्षी हेच उत्पादन २७ लाख १२ हजार टन झाले होते.
भाताच्या उत्पादनात वाढ
तृणधान्य, डाळींचे उत्पादन घटण्याचा अंदाज असताना, तांदळाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यंदा तांदळाचे उत्पादन ३४ लाख ४८ हजार टन होण्याचा कयास असून, पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये १३ टक्क्यांची वाढ होईल.
सोयाबीन, सूर्यफूल, भूईमूग, तिळाचे उत्पादन घटणार
राज्यात ५० लाख हेक्टरवर लागवड केलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात गत वर्षीच्या तुलनेत २१ लाख टनांनी घटण्याचा अंदाज आहे. यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र २२ टक्क्यांनी वाढले असले, तरी पावसाच्या लहरीपणाचा या पीकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये सहा टक्क्यांची घट अपेक्षित आहे. सूर्यफूल, भूईमूग आणि तिळाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कापसाचे क्षेत्र ४२ लाख २२ हजार हेक्टर असून, ७५ लाख ७३ हजार गाठी उत्पादित होण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या तुलनेत कापसाच्य उत्पादनात चार टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये पावसाचे उशिरा आगमन, जुलैमध्ये काही भागांत अतिवृष्टी आणि ऑगस्टमध्ये पावसाचा दीर्घकाळ खंड यामुळे अनेक पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात अन्नधान्यांची उत्पादकता व उत्पादन यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.- विनयकुमार आवटे, सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग