• Sat. Sep 21st, 2024

ऐन दिवाळीत मास्तरांचा पगार अडकणार? छ. संभाजीनगरमधील माध्यमिकचे १५४ शिक्षक ठरले अतिरिक्त

ऐन दिवाळीत मास्तरांचा पगार अडकणार? छ. संभाजीनगरमधील माध्यमिकचे १५४ शिक्षक ठरले अतिरिक्त

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अनुदानित शाळांमधील पटसंख्या वेगाने कमी होत आहे. शिक्षण विभागाने केलेल्या संचमान्यतेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७२ शाळांमधील माध्यमिक विभागाचे तब्बल १५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त शिक्षकांसमोर आता वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन देयकात अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित करू नये, असे वेतन पथकाने स्पष्ट केल्याने ऐन दिवाळीत पगार होणार का नाही, असा प्रश्न शिक्षकांना आहे.

जिल्ह्यात माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली. कोविडनंतर शाळांमधील पटसंख्येचा मोठा प्रश्न समोर आला आहे. कोव्हिडनंतर अनेक कायम विनाअनुदानित शाळा बंद पडल्या. अनुदानित शाळांची पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात माध्यमिक शाळांमधील पटसंख्या घटल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात १५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. विविध ७२ शाळांमधील हे शिक्षक असल्याचे सांगण्यात येते. शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन कोठे करायचे, यावर शिक्षण विभागासमोर पेच असल्याचे सांगण्यात येते. प्राथमिक स्तरावरील शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. काही शाळांच्या संचमान्यता झालेल्या आहेत. काहींमध्ये दुरुस्ती असल्याने त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा नेमकी संख्या किती याबाबत स्पष्टता नाही. संचमान्यतेत काही दुरुस्ती आहेत. त्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

समायोजनाकडे लक्ष

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कोठे, कसे होणार याकडे लक्ष लागते. त्याचवेळी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन देयकामध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित करू नये, असे मुख्याध्यापक, प्राचार्यांना वेतन पथकाने पत्राद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना आता पगारही मिळणार का, नाही असा प्रश्न सतावतो आहे. दिवाळीसारख्या सणांमध्ये पगार थांबले तर अडचणी आर्थिक अडचणींचा सामना शिक्षक, कर्मचाऱ्यांना करावा लागणार आहे.
अनुदानित शाळांतही होणार ‘मूल्यांकन’; शिक्षण विभागाकडून नियतकालिक चाचणीची तयारी
वेतन पथकाने संचमान्यतेतील मंजूर पदानुसारच ऑक्टोबरचे वेतन देयक काढण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. समायोजनाची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. अद्याप समायोजनाची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. आता दिवाळीसह इतर सण येत आहेत. अशा वेळी वेतन थांबवणे योग्य नाही.- प्रदीप विखे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ, माध्यमिक विभाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed