सौरऊर्जेचे उष्णतेत रूपांतर करणारी उपकरणे जगभरात सर्वत्र वापरली जातात. त्यामध्ये सौर हीटरसारख्या उपकरणांचाही समावेश आहे. सद्यस्थितीत देशात २.५ टक्के घरांमध्ये सौर हीटर वापरले जात असल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून दिसून येते. सौर उष्णता शोषून घेणारी उपकरणे ही बहुधा महाग, बोजड आणि पर्यावरणासाठी हानीकारक असल्याचे दिसून येते. त्यामध्ये सूर्यप्रकाशाचे उष्णतेत रूपांतर करण्यासाठी जो लेप (कोटिंग्स) दिला जातो, त्यात क्रोमियम किंवा निकेलच्या फिल्म्ससारखे पदार्थ वापरलेले असतात. हे पदार्थ पर्यावरणासाठी घातक असून, त्यांची सौरउर्जेचे औष्णिक उर्जेत रूपांतर करण्याची क्षमताही ६० ते ७० टक्के एवढी असते. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वांत चांगल्या उपकरणांची रूपांतरणाची क्षमताही ७० टक्क्यांपर्यंत आहे, असे ‘एनसीएफ’ विकसित करणाऱ्या अभ्यासगटाच्या प्रमुख डॉ. अनन्या साह यांनी सांगितले.
आयआयटीच्या संशोधकांनी तयार केलेले ‘एनसीएफ’ हे तंत्रज्ञान कार्बनचे बनलेले आहे. ते खर्चिक नसून पर्यावरणपूरक आणि वापरायला सोपे आहे; तसेच त्याच्या देखभालीचा खर्चही तुलनेने कमी आहे, असेही साह यांनी नमूद केले.
‘एनसीएफ’वर पडणाऱ्या अतिनील (अल्ट्राव्हायोलेट), दृश्य (व्हिजिबल) आणि अवरक्त (इन्फ्रारेड) प्रकाशातील ९७ टक्के प्रकाश शोषला जातो. त्याचे प्रभावीपणे औष्णिक ऊर्जेत रूपांतर होते. ‘एनसीएफ’द्वारे सामान्य तापमानाला असलेली हवा ६० अंश सेल्सिअसपर्यंत गरम करणे शक्य आहे. त्यातून कोणत्याही प्रकारचा धूर किंवा प्रदूषण न करता खोली उबदार ठेवणे शक्य आहे. याचा वापर भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या लेह, लडाखसारख्या थंड हवेच्या प्रदेशात इमारती गरम ठेवण्यासाठी होऊ शकतो, असे या संशोधनातील अभ्यासिका आणि आयआयटी मुंबईमधील रसायनशास्त्र विभागातील प्रा. सी. सुब्रमण्यम यांनी नमूद केले.
पाण्याचे वाफेत रूपांतर करण्याची ‘एनसीएफ’ची कार्यक्षमता १८६ टक्के असून, आतापर्यंतच्या सर्व पद्धतींमध्ये सर्वोच्च अशी आहे; तसेच ‘एनसीएफ’चा एक चौरस मीटरचा लेप एका तासात पाच लिटर पाण्याचे वाफेत रूपांतर करू शकतो. बाजारात उपलब्ध असलेल्या बाष्पीभवनाच्या सौर उपकरणांपेक्षा ही क्षमता पाचपट आहे, असेही प्रा. सुब्रमण्यम यांनी नमूद केले.
आयआयटीकडून उत्पादन
‘आयआयटी, मुंबई’तील या संशोधकांच्या गटाने आयआयटीतील ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रेप्रेनरशीप’ (एसआयएनई) येथे ‘एनसीएफ’चे व्यावसायिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी कंपनीची स्थापना केली आहे. ‘एनसीएफ’चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासह पाण्याचे हीटर व स्पेस हीटिंगसाठी ‘एनसीएफ’आधारित उपकरणे विकसित करण्यावर कंपनीकडून लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या प्रयत्नांत त्यांना ‘ट्रान्स्लेशनल रीसर्च ॲक्सेलरेटर प्रोग्रॅम’मार्फत आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांचे साह्य लाभले आहे, असे आयआयटी प्रशासनाने सांगितले.