• Mon. Nov 25th, 2024
    अमली पदार्थांचे हब, नाशिकच्या शिंदे गावची प्रतिष्ठा धुळीस, ड्रग्ज माफियांवर गावकऱ्यांचा संताप

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : अमली पदार्थांचे हब म्हणून शिंदे गाव पुढे आल्याने ग्रामस्थांना मोठा धक्काच बसला आहे. एवढा मोठा प्रकार स्थानिक नागरिकांच्या नजरेतून सुटला तसा ग्रामपंचायत, पोलिस यंत्रणा आणि एमआयडीसी या जबाबदार यंत्रणांच्या डोळ्यांत देखील ड्रग्ज माफियांनी धूळ फेकल्याची बाब उघड झाली. गेला संपूर्ण आठवडाभर शिंदे गावातील नागरिकांच्या डोक्यातून हा विषय दूर होऊ शकलेला नसून, गावाची मान खाली गेली, अशी शल्य वाटणारी भावना येथील सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.

    गावाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. यास कारणीभूत यंत्रणांवर सरकारने अजिबात मेहेरबानी करू नये, असे गौरी जाधव या विद्यार्थिनीने म्हटले आहे. गावालगतच एमडीसारख्या घातक अमली पदार्थांचा कारखाना मिळून येणे म्हणजे व्यसनाधीनतेला यंत्रणांकडूनच खतपाणी दिल्यासारखे आहे, असे हॉटेल व्यावसायिक राहुल तुंगार यांनी म्हटले आहे. एमडीसारखा अमली पदार्थ सर्रास तयार केला जात असलेल्या कंपनीबाबत पोलिसांना माहिती नसणे हे अविश्वसनीय आणि अनाकलनीय वाटते, असे पेटंट तज्ज्ञ महेंद्र पांगारकर यांनी म्हटले आहे.

    गावाच्या हद्दीत अमली पदार्थ तयार करणारी कंपनी, अमली पदार्थांचा साठा असलेले गोदाम आढळून येणे हा गावच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून यापुढे याविषयावर अधिक गंभीर उपाययोजना करू.

    – गोरख जाधव, सरपंच, शिंदे

    ज्या उत्पादनासाठी कंपनीची परवानगी आहे, त्याचे उत्पादन होते किंवा नाही याची खात्री करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. भाडेकराराने शेड, गाळे, गोदाम दिल्यास त्याची माहिती ग्रामपंचायतीकडे असणे बंधनकारक आहेच.

    – संजय तुंगार, माजी जिल्हा परिषद सदस्य

    नाशिकरोड ‘एमडी’ पंचनामा

    एकूण मुद्देमाल : पाच कोटी ९४ लाख ६० हजार ३०० रुपये

    जप्त मुद्देमाल किंमत

    ४.८७० ग्रॅम एमडी : पाच कोटी ८४ लाख ४० हजार रुपये

    ३ बॅरल क्लोरोफॉर्म : एक लाख आठ हजार रुपये

    ९० बाटल्या ब्रोमिन वॉटर : एक लाख आठ हजार रुपये

    ४ ड्रम मिथे अमाइन : ४० हजार रुपये

    ५ ड्रम हायड्रोक्लोरिक ॲसिड : १२ हजार रुपये

    ७० लिटर ॲसिड (अज्ञात) : १४ हजार रुपये

    ३ बॅरल केमिकल (अज्ञात) : एक लाख २० हजार रुपये

    ३ बॅरल अँसिटोन : ४८ हजार रुपये

    १२ ड्रम क्लोरोफॉर्म : ८६ हजार चारशे रुपये

    ५ ड्रम इंडस्ट्रियल सॉल्व्हंट : २५ हजार रुपये

    १७ लिटर केमिकल (अज्ञात) : तीन हजार चारशे रुपये

    १ ड्रम केमिकल (अज्ञात) : दोन हजार रुपये

    १ ड्रम केमिकल (अज्ञात) : सहा हजार रुपये

    हिटिंग कॉइलचे भांडे : ७० हजार रुपये

    १०० लीटरचे चंबू : एक लाख रुपये

    ३ ओव्हन : एक लाख ५० हजार रुपये

    २५ लीटरचे दोन चंबू : ५० हजार रुपये

    बर्फाचे तुकडे करणारे मशिन : पाच हजार रुपये

    काचेचे ५ ट्रे : २,५०० रुपये

    सिरॅमिक कच्चा माल : १० हजार रुपये

    काचेचे चंचूपात्र : १० हजार रुपये

    वडाळा ‘एमडी’ पंचनामा

    एकूण मुद्देमाल : दोन लाख २३ हजार २८० रुपये

    ५४.५ ग्रॅम एमडी : एक लाख ६३ हजार ५०० रुपये

    १ किलो २८८ ग्रॅम : २५ हजार ७६० रुपये

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed