तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात तक्रार दिल्यामुळे शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यातून शाळांच्या परिसरात करण्यात येणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. तब्बल १२ यंत्रणांना तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र बहुतांश सर्वच यंत्रणांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने या पदार्थांची शाळांच्या परिसरात सर्रास विक्री होताना दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांविरोधात एकही कारवाई केली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांदिवली पूर्वेला रेल्वे स्थानकानजीकच असलेल्या आकुर्ली उच्च प्राथमिक शाळा समूह मुंबई पब्लिक स्कूल या शाळेच्या समोरच असलेल्या पान टपरीवर सिगारेट, तंबाखू यांच्यासह गुटख्याचीही सर्रास विक्री होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता ही बाब समोर आली. कांदिवली पूर्वेकडील पायोनियर पब्लिक स्कूल शाळेपासून १०० मीटरहून कमी अंतरावर दोन टपऱ्यांवर तंबाखूूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे चित्र होते. तसेच कांदिवली येथील क्रांतिनगर भागातील शाळेबाहेरही या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. चांदवली येथील संघर्षनगर वसाहतीतील पालिकेच्या शाळेसमोरील टपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असून अनेक शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी गेल्याचे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष संदेश डवरे यांनी सांगितले. तसेच घाटकोपर परिसरातही अनेक शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे, अशी माहिती शिक्षक भारती महाराष्ट्र राज्यचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.
विक्रेत्यांवर कारवाई करावी
‘सुगंधी सुपारीच्या नावाखाली अनेक मुले तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. या टपऱ्यांवर कार्यालयातील कर्मचारी येऊन सिगारेट ओढतात. त्याचा परिणाम मुलांवर होतो. त्यातून फॅशन ट्रेंडच्या नावाखाली हे पदार्थ उपलब्ध झाले की, मुले त्यांचे सेवन करतात. त्यामुळे ही दुकाने शाळेच्या आसपास १०० मीटरच्या बाहेरही नकोत,’ असे मत पायोनियर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक संजय जाधव यांनी व्यक्त केले. ‘हक्काची बाजारपेठ समजून शाळेच्या परिसरातच टपऱ्या टाकून तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. यातून नकळत विद्यार्थी व्यसनांकडे ओढले जाण्याची शक्यता असते. या विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी,’ अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केली.