एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या (मिटसॉग) वतीने आयोजित मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंटच्या (एमपीजी १९) तुकडीच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी खासदार सुस्मिता देव, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार उल्हास पवार, युनिव्हिर्सिटीचे अध्यक्ष राहुल कराड, संस्थापक विश्वनाथ कराड उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजकारणात प्रवेश करावा. राष्ट्रभाव, दूरदृष्टी आणि भाषेवर नियंत्रण यांसारखे गुण राजकारणात येतांना अंगी असायला हवे. लोकांना आपल्यासोबत पुढे घेऊन जाणारा नेता असतो. राजकारणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकस्तरावर काम करावे लागेल. धर्म-जातींचे राजकारण करून, क्षणिक फायदा घेता येईल. मात्र, आपल्याला माणसाला माणसांशी जोडणारे राजकारण करायचे आहे. द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवून काम करायचे आहे. समाजाचा विचार करून, काम कराल तर मोठे नेचे व्हाल. स्वत:चा विचार करून वाटचाल करून, नेते होता येणार नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सुस्मिता देव म्हणाल्या की, राजकारणाचे कुठेही प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला राजकारण हे अनुभवातूनच शिकता येणार आहे. राजकारण हा व्यवसाय नसून, तो समाजसेवेचा एक अविभाज्य अंग आहे. या क्षेत्रात चांगले काम केल्यावरही कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही, असे देव यांनी स्पष्ट केले. राहुल कराड म्हणाले की, देशात उत्तम ‘पॉलिटिकल स्कूल’ची गरज आहे. या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. मिटसॉगचे संचालक डॉ. के.गिरीसन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. परिमल माया सुधाकर यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली.
आमदारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
राज्यातील आमदारांसाठी मिटसॉगबरोबर मिळून गव्हर्नंन्स कोर्स लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी मुंबई, पुणे व नागपूर येथील विधानमंडळात हा प्रशिक्षण कार्यक्रम चालेल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांतर्गत आमदारांनाही क्रॅश कोर्स करण्यासाठी मिटसॉगमध्ये पाठवता येईल. या कार्यक्रमांतर्गत मिटसॉगच्या विद्यार्थ्यांना विधानसभा, विधान परिषदेत इंटर्नशीपची संधी देण्यात येईल, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. राष्ट्राच्या प्रगतीसाठी व फायद्यासाठी हा पाठ्यक्रम महत्वाचा आहे. भावी नेत्यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यातील आव्हानांना ओळखून त्यावर, उत्तरे शोधावीत. युवा भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून, आता स्कील्ड युवक निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra News And Marathi News