मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील मुबीन अन्सारींची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. पदरी ३ मुली एक मुलगा. दोन मुलींची आणि मुलाचे लग्न करून दिले. भावंडांमध्ये लहान असलेली हसऱ्या चेहऱ्याची शांत स्वभावाची निखत. अबोल असलेला काळजाचा हा तुकडा आपल्या जवळपास असावा असं मुबीन यांना सारखं वाटायचं. त्यातच त्यांच्या सुनेच्या भावासाठी निखतचा हात मागण्यात आला. मुलाला लवकरच नोकरी लागणार आहे, असंही सांगण्यात आलं.
काळजाचा तुकडा जवळ राहील या आशेने त्यांनी या लग्नाला होकार दिला. लग्नानंतर नवरीचे ९ दिवस सरले अन् सासरच्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मुलगा काही नोकरी लागला नाही. त्यामुळे दुकान टाकण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून निखतच्या मागे लागले. ते सतत तिचा मानसिक, शारीरिक छळ करू लागले. मात्र, आई-वडिलांसाठी तिने सगळं काही सहन केलं.
अखेर ही गोष्ट तिच्या आईच्या कानावर गेली. पण ‘आताच तुझ्या लग्नाच्या कर्जातून उतराई होत आहे. थोडा धीर धर, मी करतो काहीतरी’ असं सांगून १५ दिवसापूर्वीच निखतचे वडील तिला भेटून आले होते. पण गेल्या काही वर्षांपासून होत असलेला त्रास सहन न झाल्याने निखतने औसा येथील तिच्या राहत्या घरातून उडी मारत आत्महत्या केली. यामुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रेमळ स्वभावाच्या आठवणी मागे ठेऊन काळजाचा तुकडा असा जगातून निघून गेला. कधीच न संपणारं डोंगराएवढं दुःख घेऊन तिचे आई-वडील अश्रू ढळतायत. इतर कोणावरही ही वेळ येऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
निखतचा मोठा भाऊ हरून मुबीन अन्सारी यांनी औसा पोलीस ठाण्यात निखतचे पती अय्याज एजाज सय्यद आणि सासरे एजाज सय्यद, सासू जाहिदा सय्यद, दीर इलियाज सय्यद जाऊ फिरदोस सय्यद यांच्या विरोधात निखतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार देऊन न्यायाची मागणी केली आहे.