• Sat. Sep 21st, 2024

चला गं सयांनो गौराई पुजूया…मंगलमय वातावरणात महालक्ष्मींचे आगमन; आज गौराईंचे महापूजन आणि नैवेद्य

चला गं सयांनो गौराई पुजूया…मंगलमय वातावरणात महालक्ष्मींचे आगमन; आज गौराईंचे महापूजन आणि नैवेद्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आली आली गौराई…, सोन्या-रूप्याच्या पावलाने…’ ‘आली आली गौराई…, धनधान्याच्या पावलाने…’ गणरायापाठोपाठ माहेरपणासाठी आलेल्या महालक्ष्मींचे गुरुवारी घराघरात मंगलमय वातावरणात महिलांनी स्वागत केले. शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांची धावपळ झाली. मात्र, गौरी आगमनाचा उत्साह कायम होता. आज, शुक्रवारी गौरींचे महापूजन होणार असून, त्यांना नैवेद्य दाखविण्यात येईल.

महालक्ष्मीचे आगमन हा महिलांचा आवडता सोहळा. घराची स्वच्छता करण्यापासून ते गौरींच्या आदरातिथ्यासाठी महिला महिनाभर आधीपासून नियोजन करतात. गौरींचे रेखीव, सुबक मुखवट्यांची खरेदी असो, की त्यांच्यासाठी काठपदाराच्या साड्या, दागिन्यांची निवड करण्यामध्ये चोखंदळ महिलांचा उत्साह दर वर्षी कायम असतो. शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे, फराळ तयार करण्याचे काम सुरू असते. नोकरदार स्त्रिया जागरण करून जय्यत तयारी करतात.

यंदाही घराघरात महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे. शहरात गुरुवारी ज्येष्ठा आणि कनिष्ठा माहेरवाशीणी म्हणून गौराई घराघरात दाखल झाल्या. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या, पितळाच्या, तर काही ठिकाणी सात खड्यांच्या रूपांत गौराईचे आगमन झाले. नदीवर जाऊन महिलांनी सात खडे आणले. दारात सडा रांगोळी करून पारंपरिक गीते गात गौराईचे स्वागत केले. हळदी आणि चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले. रेशमी साड्या, नाजूक दागिने परिधान केलेल्या गौराईंनी वातावरणात चैतन्याचे रंग भरले. आज, शुक्रवारी महालक्ष्मींचे महानैवेद्य दाखवून पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाणार आहे.
नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात होते निर्माल्यापासून धूपनिर्मिती, हार-फुलांचा असाही सदुपयोग
पावसातही महिलांची खरेदी

गौराई आगमनानंतर दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांची पावसामुळे धावपळ झाली. संध्याकाळपर्यंत पाऊस थांबण्याची वाट बघून शेवटी महिला छत्री, रेनकोट घालून फुले आणि भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारात गेल्या. गौराई पूजनाला विविध प्रकाची फुले आणि नैवेद्यामध्ये विविध भाज्यांना विशेष मागणी असते. त्यामुळे एरवी मंडईत बघायला न मिळणारी भाजी आणि फुले दाखल झाली होती. महात्मा फुले मंडई, शनिपार, गुलटेकडी यांसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये रात्री उशिरापर्यंत महिलांची लगबग सुरू होती. फुलांच्या बाजारात निशिगंध, अॅस्टर, शेवंती, मोगरा, गौरींचे हात यांसह पत्री आणि दुर्वांना सर्वाधिक मागणी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed