• Sat. Sep 21st, 2024

मान्सूनच्या परतीचा प्रवास कधीपासून सुरू होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

मान्सूनच्या परतीचा प्रवास कधीपासून सुरू होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची यंदाची सुरुवात येत्या सोमवारपासून होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला.

‘सध्या वायव्य भारतावर प्रतिचक्रवात स्थिती निर्माण होत असून, राजस्थानच्या नैर्ऋत्य भागामध्ये कोरडे वातावरणही निर्माण झाले आहे. पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याने पश्चिम राजस्थानच्या बहुतांश भागातून २५ तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल,’ अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबरपासून मान्सूनचा देशातून परतीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातून ५ ते १० ऑक्टोबर या कालावधीत मान्सून माघारी फिरतो.

पुण्यातील पाबे घाटात दरड कोसळली; वाहतूक काही काळासाठी ठप्प, सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन

वायव्य भारतामध्ये तसेच पश्चिम मध्य भारतामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी २० सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर २० ते २८ सप्टेंबर या कालावधीत परतीचा मान्सून राजस्थानमध्येच रेंगाळला होता. त्यानंतर ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यानही मान्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड पडला होता. राज्यातूनही मान्सून माघारीसाठी १४ ते २२ ऑक्टोबर असा दीर्घ कालावधी लागला आणि त्यानंतर २३ ऑक्टोबरला संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते.

पर्जन्यमानातील तीव्र बदल चिंतेची बाब

यंदाच्या मान्सून परतीच्या चिन्हांनंतर २०२३ चा मान्सून हा सरासरीपेक्षा कमी असेल असे केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, देशातील एकूण पाऊस हा चिंतेची बाब नसून पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पाऊस पडण्याच्या प्रमाणात झालेले तीव्र बदल ही महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तीव्र काळ सक्रीय असलेला पाऊस आणि तीव्र काळ सक्रीय नसलेला पाऊस याची वारंवारता वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा बदलांसाठी सज्ज राहण्याची तयारी आता करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. सर्वसाधारणपणे १९७१ ते २०२० या ५० वर्षांमधील पावसाच्या आकडेवारीची सरासरी लक्षात घेता सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते. मात्र यंदा हे प्रमाण सप्टेंबरमध्ये वाढलेले दिसत आहे. दुसरीकडे १ जून ते २२ सप्टेंबर या कालावधीत देशात एकूण पाऊस ८३२.४ मिलिमीटर असतो. यंदा हा पाऊस ७८०.३ मिलीमीटर नोंदला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed