सांगली जिल्ह्यात सन २०१९ आणि २०२१ मध्ये महापूर आला होता. यावर्षी देखील जिल्ह्यात पावसाने दमदार एन्ट्री केली होती. पावसाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या होत्या. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या जत, आटपाडी, खानापूर इत्यादी भागांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे.
सांगली शहरात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला असला तरी जिल्ह्यात मात्र तुरळकच बरसला आहे. खरिपाची पिकं पूर्णपणे वाया गेलं असली तरी अद्याप देखील शेतकरी हे पावसाकडे डोळे लावून बसल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांसह नागरिक पाऊस पाडवा अशी प्रार्थना करत होते. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या या पाऊसमुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला. सुमारे तासभर पडलेल्या या पाऊसा मुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना समाधान मिळाले.
सध्या खरिपाची पिके वाया जाण्याची भीती असताना आज पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वरुणराजा पुन्हा बरसवा अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत.
दरम्यान, सांगली शहराला तासभर झोपून काढलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. असे असले तरी सांगली मधील कृष्णा नदी आणि जिल्ह्यातील बहुतांश तलाव हे कोरडे पडले असल्याने जिल्हा मात्र तहानलेलाच असल्याचे दिसून येते. सांगली शहरात पावसानं हजेरी लावली असली तर जिल्हा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस न झाल्यास खरीप हंगामासोबत रब्बी हंगाम देखील अडचणीत येऊ शकतो.