• Sat. Sep 21st, 2024

‘इंडिया’च्या सभेसाठी कॉंग्रेस नेते सरसावले; भोपाळबाबतच्या अनिश्चिततेमुळे ‘दीक्षाभूमी’तून पुढाकार

‘इंडिया’च्या सभेसाठी कॉंग्रेस नेते सरसावले; भोपाळबाबतच्या अनिश्चिततेमुळे ‘दीक्षाभूमी’तून पुढाकार

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : इंडिया आघाडीच्या भोपाळ येथील सभेबाबत अनिश्चितता आल्याने ही सभा देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात व्हावी, यासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत.

इंडिया आघाडीचे बळ सातत्याने वाढत आहे. आघाडीची या महिन्याच्या प्रारंभी मुंबईत बैठक झाली. केंद्राविरुद्ध जाहीर एल्गार व विरोधी पक्षाच्या ऐक्याचा संदेश देण्यासाठी राज्यांच्या राजधानीत जाहीर सभा घेण्याचा निर्णय आघाडीने घेतला. पहिल्या सभेसाठी भोपाळ निश्चित करण्यात आले. मात्र, मध्य प्रदेशातील निवडणुकीमुळे भोपाळबाबत अनिश्चितता उद्भवली. सनातन धर्माबाबत आघाडीच्या नेत्यांनी टीका केल्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्यासाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे आता नव्याने शहराचा विचार करण्यात येत आहे.

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने केंद्राविरुद्ध बिगुल फुंकणे आणि दीक्षाभूमीमुळे लोकशाही व संविधान बचावची घोषणा करण्यासाठी येथे सभा व्हावी, यासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले. उपराजधानीतील सभेचा शंखनाद देशाच्या चारही दिशांनी घुमतो, अशी भूमिका काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांची आहे.
हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडातील वातावरण तापलं, परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीयांना महत्त्वाची सूचना
इंडिया आघाडीची सभा नागपुरात झाल्यास त्यातून देशाच्या कानाकोपऱ्यात सूचक संदेश जाईल. देशातील प्रमुख चळवळीचे केंद्र नागपूर राहिले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व पक्षाच्या अन्य प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून सभा येथे घ्यावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झाले असून वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतल्यानंतर इंडिया आघाडीच्या सभेसाठी शहर निश्चित होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed