• Tue. Nov 26th, 2024

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २५ सप्टेंबरपासून हेल्मेटसक्ती; नियमभंग केल्यास भरावा लागेल इतका दंड

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २५ सप्टेंबरपासून हेल्मेटसक्ती; नियमभंग केल्यास भरावा लागेल इतका दंड

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीचा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. हेल्मेट घाऊन न येणाऱ्याला एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सुरक्षा रक्षक आणि वॉचमन यांना मात्र दोन हजार रुपये दंड केला जाणार आहे. दंडाची रक्कम कर्मचारी कल्याण निधीमध्ये जमा केली जाणार आहे.

    काही वर्षांपूर्वी शहर पोलिस विभागातर्फे हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती. परंतु करोना संसर्गाच्या लाटेत हेल्मेटसक्तीचा प्रयोग मागे पडला. पोलिसांनी या सक्तीतून लक्ष काढून घेतले. त्यामुळे बहुतांश दुचाकीस्वार विना हेल्मेट दिसून येतात. आता महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. ‘हेल्मेटची सक्ती केवळ महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित असेल. पालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना ही सक्ती असणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. श्रीकांत म्हणाले, ‘हेल्मेटसक्तीचा निर्णय २५ सप्टेंबरपासूनच अंमलात आणला जाईल. जे अधिकारी किंवा कर्मचारी विना हेल्मेट कार्यालयात येतील त्यांना एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.’
    छत्रपती संभाजीनगरकरांनो सावधान! रस्त्यावर कचरा टाकणं आता पडणार महागात, भरावा लागेल इतका दंड
    ‘सुरक्षारक्षक आणि वॉचमन यांना दोन हजार रुपयांचा दंड जाहीर करण्यात आला आहे. कारण शिस्तपालनाची जबाबदारी त्यांच्यावर असते,’ असा उल्लेख त्यांनी केला. दंडातून जमा होणारी रक्कम कर्मचारी कल्याण निधीमध्ये जमा केली जाणार आहे.

    पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या कार्यालयांपुरता हा निर्णय असून, दुचाकीवरुन येणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे.-जी. श्रीकांत, आयुक्त, महापालिका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed