मुंबई : देशभरात गणेशोत्सवाचा सोहळा काल पार पडला. घरोघरी गणरायाचा आगमन झालं. या आगमनाला वरूण राजानेदेखील हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यांमध्ये पावसासाठी पोषक हवामान असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आगामी २ दिवसांमध्येही पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढच्या २ दिवसांमध्ये पुण्यासह राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळेल तर आज बुधवारी विदर्भात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण परिसरामध्ये तुरळक पाऊस होईल, असा अंदाज आहे. तर राज्यात पुढच्या ३-४ दिवसांमध्येदेखील पाऊस सक्रिय असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
इतकंच नाहीतर शुक्रवारपासून राज्यामध्ये काही भागात पावसाचा जोर आणखी तीव्र होईल, अशी ही शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्यापासून म्हणजे २१ सप्टेंबरपासून पुण्यासह घाटमाथ्यावर आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, पालघरमध्येही ढगाळ वातावरण असेल. तर काही ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळेल. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी नागरिकांनी हवामानाचा अंदाज घ्यावा असा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोकणात सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट आहे. चिपळूण इथे गडगटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.