• Sat. Sep 21st, 2024

डॉक्टर रस्त्यात बेशुद्धावस्थेत पडले होते, पोलिसांनी पाहणी करताच धक्कादायक सत्य समोर; खुनाचाही उलगडा!

डॉक्टर रस्त्यात बेशुद्धावस्थेत पडले होते, पोलिसांनी पाहणी करताच धक्कादायक सत्य समोर; खुनाचाही उलगडा!

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पैशांच्या वादातून रिक्षाचालकाने डोक्यात दगड घालून डॉक्टरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शिळ-डायघर परिसरात घडला असून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. वसीम सत्तार मेमन असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिळ-डायघरमधील फडके पाडा येथील तलावासमोर रोडलगत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर या व्यक्तीच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांच्या खिशात असलेल्या मोबाइलवरून नातेवाइकाची माहिती घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव डॉ. सिराज अहमद मंजूर अहमद खान (६२) असून ते, मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली. खान यांना रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Maharashtra Rain News : राज्यात आज पावसाचं सावट; मुंबई, पुण्यासह या भागांना हवामान खात्याचा इशारा

खान यांच्या मृत्यूची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांचा ओळखीचा रिक्षाचालक वसीम सत्तार मेमन (४४) आणि खान यांच्यात पैशांवरून वाद होते, असे उघड झाले. खान यांना आदल्या दिवशी फोनही आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खान यांच्या नातेवाइकांनीही मेमन याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांचे पथक स्थापन केले. तांत्रिक विश्लेषण तसेच, घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरणाची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी मेमन याच्याविरुद्ध पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले. त्यामुळे मेमन याला पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर खान यांच्या हत्येचा उलगडा झाला.

दरम्यान, पैशांच्या जुन्या वादातून मेमन हा खान यांना रिक्षातून फडके पाडा येथे घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने डोक्यात दगड घालून खान यांची हत्या केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मेमन याला अटक केली. आरोपी अमृतनगरमध्येच राहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed