मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्र परवाना मिळविण्यासाठी उपराजधानीत स्पर्धा लागली आहे. गेल्या सहा महिन्यांत सुमारे ४३० जणांनी शस्त्र परवानासाठी अर्ज केले. पोलिसांनी त्यांची चारित्र्य पडताळणी केली असता अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्यांचे परवाना अर्ज रद्द करण्यात आला. यापैकी केवळ १७ जणांचेच अर्ज मंजूर करण्यात आले.
असा मिळतो परवाना
परवाना काढण्यासाठी एनडीएएल या साइटवर ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. याशिवाय पोलिस आयुक्तालय किंवा पोलिस अधीक्षक कार्यालयातही प्रत्यक्ष अर्ज केल्या जाऊ शकतो. अर्ज आल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशन व संबंधित पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व चारित्र्य पडताळणी केली जाते. त्यानंतर गुन्हेशाखा व विशेष शाखेच्या उपायुक्तांकडून त्यावर अभिप्राय दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेनंतर शाहनिशा करून पोलिस आयुक्त परवाना मंजूर करतात.
यांना मिळतो परवाना
एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाल्यास, त्याच्या जिवीतास धोका असल्यास अग्निशस्त्र परवाना दिला जातो. यासह क्रीडा जगतातील खेळाडू, बँकेचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कंपनीतील कर्मचारी यांना परवाना देण्यात येतो. परवाना मिळाल्यानंतर त्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. आत्मरक्षणासाठीच शस्त्राचा वापर करणे बंधनकारक आहे. तसा पुरवाही द्यावा लागतो.
चारित्र्यासह संपूर्ण पडताळणीकरून अग्निशस्त्र परवाना देण्यात येतो. परवानाधारकांनी स्वत:सह शस्त्राचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारक धाक दाखवू नये. शस्त्राचा वापर करू नये, असे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.