• Wed. Nov 27th, 2024

    ‘निपाह’ आजाराबाबत महाराष्ट्र सरकारचा सतर्कतेचा इशारा‌; प्रशासनाला काय सूचना दिल्या?

    ‘निपाह’ आजाराबाबत महाराष्ट्र सरकारचा सतर्कतेचा इशारा‌; प्रशासनाला काय सूचना दिल्या?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : केरळमध्ये निपाह या विषाणूजन्य आजाराने दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता राज्य सरकारनेही यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व महापालिका, तसेच जिल्हा रुग्णालयांना अशा प्रकारच्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय नियमावलीचे पालन करून वैद्यकीय उपचार, नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आरोग्यसेवा संचालनालयाने सूचित केले आहे.

    निपाह संसर्गाने केरळमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असला, तरी या आजाराचा राज्यात फारसा धोका संभवत नाही; तरीही राज्यातही सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे सरकारच्या वतीने सूचित करण्यात आले आहे. निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण सर्व स्तरांवर होणे गरजेचे आहे, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे. निपाह विषाणू सर्वप्रथम १९९८मध्ये मलेशियामध्ये आढळून आला होता. भारतात सिलिगुडी (२००१) आणि २००७ मध्ये पश्चिम बंगालमध्ये या विषाणूचा उद्रेक झाला. बांगला देशात या आजाराचा उद्रेक दरवर्षी दिसून येतो. केरळ येथे २०१८ आणि २०२१ रोजी कोझिकोड येथे निपाचा उद्रेक झाला होता.

    Weather Forecast : महाराष्ट्रातील तहानलेल्या भागाची चिंता मिटणार; पुढील ३ दिवसांत पाऊस बरसणार, असा आहे ताजा अंदाज

    विषाणूचा प्रसार कसा होतो?

    या विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने वटवाघळाच्या मार्फत होतो. वटवाघळाने अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने किंवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर किंवा इतर पाळीव प्राण्यांनाही या आजाराची लागण होऊ शकते. १९९८मध्ये मलेशियातील उद्रेकात वराहपालन करणारे शेतकरी प्रामुख्याने बाधित झाले होते. निपाहची लागण माणसापासून माणसाला होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेल्या खजुराच्या झाडाचा रस प्यायल्यानेही या विषाणूचा प्रसार होतो.

    लक्षणे

    निपाहच्या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध होणे, अशी लक्षणे दिसून येतात. या आजारातील उद्रेकात मृत्यूचे प्रमाण ४० ते ७० टक्के एवढे आहे.

    उपचार

    निपाह आजारावर कोणतेही विशिष्ट प्रकारचे औषध नाही. रॉबविरिन हे विषाणूविरोधी औषध वापरले जात असले, तरीही मुख्यत्वे लक्षणाधारे उपचार आणि साह्यभूत मदत यावर भर दिला जातो.

    निदान

    या विषाणूच्या निदानासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा, नाकस्राव, मूत्र, रक्त या नमुन्यांची तपासणी राष्ट्रीय विज्ञान संस्था पुणे येथे करण्यात येते.

    सर्वेक्षण

    निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात एईएस रुग्णांचे सर्वेक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

    कोणती लक्षणे तपासावीत?

    ज्या रुग्णाला ताप, डोकेदुखी, फार झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे असलेला कोणताही रुग्ण, तसेच जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वरासाठी निगेटिव्ह असणे, त्याचप्रमाणे मागील तीन आठवड्यांत निपाबाधित भागांमध्ये विशेषतः केरळ, ईशान्य भारत अथवा बांगलादेश सीमेलगतच्या भागातील प्रवासाचा इतिहास असणे. अशा वर्णनाच्या कोणत्याही रुग्णास, संशयितास निपा रुग्ण म्हणून गृहीत धरावे. असा रुग्ण आढळल्यास या रुग्णास विलगीकरण कक्षात भरती करावे, त्याचा नमुना पुणे येथील एनआयव्ही येथे पाठवण्यात यावा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed