• Sat. Sep 21st, 2024
तापी नदीवरील महत्त्वाचा पुलाचा एक भाग कोसळला, महाराष्ट्रातून २ राज्यांमध्ये जाणारी वाहनं वळवली

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदीवरील सारंगखेडा इथे पूलाचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नंदुरबार-धुळे जिल्ह्याला आणि मध्य प्रदेश गुजरात राज्याला जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. नुकताच या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ४ कोटी रुपये खर्च करून दुरूस्ती करण्यात आलेली होती. मात्र, आता हा पूल कोसळल्याने नजदीकच्या गावकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठी कसरत करावा लागत आसल्याचे दिसून येत आहे.

या पुलावरून दररोज हजारो वाहनं महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात येत जात असतात. त्यामुळे या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. पण, सुदैवाने या ठिकाणी मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना घडल्यानंतर अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात असून या पूलाचे सोशल ऑडिट झाले आहे की नाही? असादेखील आता प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दिनांक १७ रोजी या पुलावर छोटे भगदाड पडले होते. स्थानिकांना दिसून आल्यानंतर त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कालच पुलावरून जाणारी वाहने पूर्णपणे बंद करून वाहने इतर मार्गाने वळवली असल्याने दुर्घटना टाळली आहे. छोटे भगदाड पडलेल्या ठिकाणी आज पुलाचा काही भाग कोसळला आहे. प्रशासनाकडून या ठिकाणची पाहणी करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा गावकऱ्यांना देण्यासाठी प्रशासनाने उपयोजना करणे गरजेचे आहे. अनेक गावांचा येण्या-जाण्याचा संपर्क तुटला असून अत्यावश्यक सेवा सुरू करणे गरजेचे दिसून येत आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडासह जवळच्या अनेक गावातील नागरिकांना जावे लागत असे. शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी त्याचबरोबर दवाखाने बाजारासाठी जाणारे नागरिक यांची आता गैरसोय होणार आहे. तरी प्रशासन यावर लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed