सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथून पारसिक हिलचा डोंगर पोखरून हा रस्ता टनेल व व्हाया-डक्टच्या माध्यमातून थेट खारघर येथे उभ्या राहत असलेल्या इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्कला जोडला जाणार आहे. केटीएलआर मार्गाची एकूण लांबी ५.४९ किमी असून या मार्गाच्या दोन्ही दिशेला प्रत्येकी चार मार्गिका असणार आहेत. हा मार्ग संपूर्णत: उन्नत असून त्यावर उभारण्यात येणाऱ्या व्हाया-डक्टची लांबी ३.४ किमी आहे. पारसिक हिलचा डोंगर पोखरून १.८ किमी लांबीचा बोगदा (टनेल) या मार्गात उभारला जाणार आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने खारघर-तुर्भे टनेल रोड (केटीएलआर) उभारण्यासाठी नगरविकास विभागाने २४ जानेवारी २०२३ रोजी सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.
तुर्भे येथे होणाऱ्या वाहतुककोंडीचा ताण कमी करण्यासाठी तुर्भे ते खारघर हा नियोजित भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी सरकारकडे लावून धरली होती. हा भुयारी मार्ग झाल्यानंतर तुर्भे येथे वाहतूककोंडी न होता ही वाहतूक थेट खारघर येथे बाहेर पडेल. परिणामी सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
वाशी खाडीपुलावर बांधण्यात येणाऱ्या चौथ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. हा पूल बांधून पूर्ण झाल्यावर सायन-पनवेल मार्गावर वाहतूककोंडीची समस्या अधिक गंभीर होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता तुर्भे ते खारघर हा भुयारी मार्ग तातडीने मार्गी लावणे गरजेचे झाले आहे.
कोंडीवर तोडगा ठरण्याची आशा
सायन-पनवेल मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कल्याण व पुढे कळंबोली, जेएनपीटी, पुणे, कोकण, कर्नाटक व गोवा अशा भागात जाणारी वाहतूक याच मार्गाने होत असते. ज्या महामार्गावरुन ताशी ७० किमी वेगाने वाहने धावणे अपेक्षित आहे. मात्र वाहतूककोंडीमुळे या रस्त्यावरील वाहनांचा वेग ताशी ४० ते ५०पर्यंतच राहतो. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूककोंडी उद्भवते. प्रस्तावित टनेल रोड हा त्यावर तोडगा ठरणार आहे.