• Mon. Nov 25th, 2024

    वीज देयकाचा वेळेत भरणा न केल्यास किती दंड भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम

    वीज देयकाचा वेळेत भरणा न केल्यास किती दंड भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वीज देयकाचा वेळेत भरणा न केल्यास तब्बल सव्वा टक्का दंड भरावा लागतो. अशाप्रकारे राज्यातील १३.८९ लाख ग्राहकांना विलंबामुळे दंडासह वीजदेयक भरणा करावा लागला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत वीजदेयकाचा भरणा करावा, असे आवाहन राज्य सरकारी महावितरणने केले आहे.

    चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणे विशेष सर्वेक्षण केले. त्यामध्ये विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार ग्राहकांनी वीजदेयकाचा भरणा देय दिनांकानंतर केला. त्यामुळे त्या ग्राहकांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या १ लाख ३३ हजार आहे तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे.

    महावितरणच्या वीजदेयकावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. देयक दिनांकापासून २१ दिवसांत ते भरायचे असते. त्याची स्पष्ट मुदत ‘देय दिनांक’ नावाने दिलेली असते. त्यानंतर बिल भरल्यास सव्वा टक्का दंड द्यावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी देय दिनांकापर्यंतच देयक भरावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी केले आहे.
    वीज ग्राहकांनो, लाईटबिलाला मोबाइल नंबर लिंक आहे का? नसेल तर ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा
    ऑनलाइन पर्याय

    महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर त्यांना वीजबिलात मोठी सवलत मिळते. वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केल्यास त्यांना तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे देयक भीम ॲप, गुगल पे, पेटीएम, बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाइटवरून तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारेही भरता येते व असा ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास पाव टक्का सवलत मिळते. याशिवाय ग्राहकांनी छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलने देयक स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. या सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या महावितरणचे ६० टक्के ग्राहक ऑनलाइन देयक भरतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed