• Sat. Sep 21st, 2024

गुन्हे करणाऱ्या हातानी घडवल्या सुंदर गणेश मूर्ती; जिल्हाधिकाऱ्यांकडून तोंडभरुन कौतुक

गुन्हे करणाऱ्या हातानी घडवल्या सुंदर गणेश मूर्ती; जिल्हाधिकाऱ्यांकडून तोंडभरुन कौतुक

धुळे: धुळे येथील जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यातील कैदी शिक्षा भोगत आहेत. चार राहिल्याने त्यांना सार्वजनिक सण- उत्सवात सहभागी होता येत नाही. काहींना आपल्या गुन्ह्याबद्दल पश्चातापही होत असतो. ज्या हाताने गुन्हा केला त्या हाताने चांगले काम करण्याची कैद्यांची मनोमन इच्छाही असते आणि नेमकी हीच संधी धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाने कैद्यांना उपलब्ध करुन दिली.

धुळे जिल्हा कारागृहातील कैद्यांना गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देवून त्यांच्याकडून सुंदर पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करुन घेतल्या. आज या गणेशमूर्तीचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते त्याचे या गणेश मूर्ती विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनीही तोंडभरुन कौतुक केले. कैद्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ते म्हणाले.

फुलाराम नवरामजी मेघवाड या कैद्याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असताना उत्कृष्ट गणपती मूर्त्या साकारून शासनास निधी मिळवून दिला होता. पुढील शिक्षा भोगण्यासाठी या बंदिवानाला धुळे कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्याने त्याच्याकडील गणेश मूर्ती बनिवण्याची कला कारागृहातील बंदिवानांना शिकविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी कारागृह प्रशासनानेही सर्वतोपरी सहकार्य केले.

याकामी कारागृह शिपाई सूर्यकांत पाटील यांची नियुक्ती केली. त्यानुसार कैदी फुलाराम मेघवाड याने बंदिवानांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार बंदिवान गोपाळ माधव गायकवाड, विलास लक्ष्मण कोळी, सोपान रघुनाथ काशीद व हरीष धिरूभाई पटेल यांनी शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कला आत्मसात करत सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. धुळे जिल्हा कारागृहात बंदीवानांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, कारागृह अधीक्षक विशाल बांदल, फादर विल्सन रॉड्रीग्ज्, तुरुंगाधिकारी सचिन झिंजुर्डे, रक्षक सूर्यकांत पाटील, उदय सोनवणे, कैलास चौधरी, कमलाकर दुसाने,भगवान सरदार, विलास खलाने आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed