• Mon. Nov 25th, 2024

    नाशिक साथीच्या आजाराने त्रस्त, दहा दिवसात तापाचे दोन हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

    नाशिक साथीच्या आजाराने त्रस्त, दहा दिवसात तापाचे दोन हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बदलत्या वातावरणाचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर झाला असून, शहर तापाने फणफणल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तापसदृश आजाराच्या साथीने शहरात धुमाकूळ घातला असून, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दहा दिवसांत तापसदृश व्हायरल आजाराच्या दोन हजारांवर रुग्णांची नोंद झाली आहे. पण, खासगी रुग्णालयांमध्ये व्हायरल तापाच्या रुग्णांची मात्र रांगच लागत असल्याचे चित्र आहे. डेंग्यूचा ‘ताप’ही कायम असून, सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांतच डेंग्यूच्या रुग्णसंख्येने पन्नासचा आकडा गाठल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यंदा पाऊस कमी असतानाही डेंग्यू, मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव शहरात वाढू लागला आहे.

    ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. परंतु, पाऊस नसल्यामुळे इतर आजारांपेक्षा डोळ्याच्या साथीच्या आजाराने धुमाकूळ घातला होता. पाऊस नसतानाही डेंग्यूचा प्रकोप सुरूच होता. आता तर केवळ दोन दिवसांच्या पावसाने शहरात तापाची साथ आली आहे. हा आजार हवेतून पसरणारा ‘व्हायरल’ स्वरूपाचा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज तापाचे दोनशे ते सव्वादोनशे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये तापसदृश आजाराच्या दोन हजार ४७ रुग्णांची, तर महिनाभरात पाच हजार रुग्णांची नोंद पालिकेच्या दप्तरी झाली आहे. खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या तापसदृश आजाराच्या रुग्णांचा आकडा यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. चिकूनगुनियाचा एकही नवा रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही.

    ४० हजार वर्षांपूर्वींचा इतिहास समोर, ३२ भित्तीचित्रं, दगडी शस्त्रं, पुरातत्व विभागाला खजिना सापडला
    पालिका मूकदर्शकाच्या भूमिकेत

    शहरातील खासगी रुग्णालये आणि क्लिनिक तापाच्या रुग्णांनी ‘फुल्ल’ असताना महापालिका प्रशासन मात्र मूकदर्शकाच्या भूमिकेत आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढूनही धूरफवारणी कागदावरच आहे. रहिवासी भागात धूरफवारणी गरजेची असताना महापालिकेची यंत्रणा मात्र शासकीय कार्यालयांमध्ये डेंग्यूच्या अळ्या शोधण्यात व्यस्त आहे. महापालिकेकडून आता तातडीने उपाययोजनांची मागणी होत आहे.

    जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
    डेंग्यूचा धुमाकूळ सुरूच

    यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही डेंग्यूबाधित रुग्णांचा एकूण आकडा तीनशेपार पोहोचल्याने शहरातील धूर फवारणी कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. जूनपर्यंत शहरात ११६ डेंग्यूबाधित होते. जुलैत पाऊस कमी असतानाही २८ रुग्णांची भर पडली. ऑगस्टमध्ये ११७ रुग्णांची नोंद झाली, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ३६ डेंग्यूबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग ‘अॅलर्ट मोड’वर आला आहे.

    माझा नातू कियानला ताप, तो झोपलाय, आरडाओरड करू नका; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

    बदलत्या वातावरणामुळे तापसदृश आजाराचे रुग्ण आढळत आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत -डॉ. नितीन रावते, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *