मुंबई महापालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये, १६ उपनगरी रुग्णालये, ५० दवाखाने असून, येथील रुग्णांना लागणाऱ्या औषधांची खरेदी ही मध्यवर्ती खरेदी कक्षाकडून करण्यात येते. मात्र, औषध तुटवडा निर्माण झाल्यास स्थानिक पातळीवर प्रतिदिन ४० हजारांपर्यंत औषधे खरेदी करता येतात. याचाच फायदा घेत मध्यवर्ती खरेदी कक्षाकडून मागील तीन वर्षांमध्ये १७७९ शेड्यूल्ड औषधांपैकी फक्त ६१२ औषधांसाठीच्या निविदा अंतिम करत उर्वरित औषधांचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जातो. कृत्रिम तुटवडा निर्माण केलेल्या औषधांची खरेदी स्थानिक पातळीवर खुल्या बाजारातून करण्यात येते. ही औषधे तीन ते चारपट अधिक दराने खरेदी केली जातात. मागील तीन वर्षांत अशा प्रकारे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मागील तीन वर्षांत अंदाजे ६० कोटी रुपये, उपनगरी रुग्णालयांसाठी २५ कोटी आणि दवाखान्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या औषधांची खरेदी स्थानिक पातळीवरील औषध विक्रेत्यांकडून चढ्या दराने करण्यात आली आहे, असा आरोप ‘ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशन’ने केला होता.
…तर विभागप्रमुखांना उत्तर द्यावे लागेल
औषधांच्या तुटवड्यासंदर्भातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये वैद्यकीय सामग्री, औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उत्पादने, इंजेक्शन्स यांचा तुटवडा का निर्माण झाला आहे याची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. औषधांचे दर, किंमत आणि उपलब्धता ठरवण्याची प्रक्रिया सुलभ होईल या उद्देशाने ही माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती केईएम रुग्णालयाचे नोडल अधिकारी व फार्माकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कामत आणि डॉ. मराठे यांना देणे अपेक्षित आहे. पालिका प्रशासनाने घेतलेल्या फेरआढाव्यामध्ये काही विभागप्रमुखांनी ही माहिती दिली नसल्याचे दिसून आले आहे. प्रमुख रुग्णालये, दंत वैद्यकीय महाविद्यालये तसेच कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी हे काम तातडीने पूर्ण व्हायला हवे असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. हे काम योग्य वेळेमध्ये पूर्ण झाले नाही तर संबधित विभागप्रमुखांना त्यासाठी दोषी धरण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आहे.