• Sat. Sep 21st, 2024
मनोज जरांगे पाटलांनी अखेर तो निर्णायक घाव घातलाच; सरकारची चिंता वाढली, नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर पाणी आणि सलाइन घेण्यास नकार दिला. तसेच, वैद्यकीय तपासणी आणि उपचारही नाकारले आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. तसेच, जरांगे आंदोलन करत असलेल्या अंतरवाली सराटी (ता. अंबड) परिसरातील तीनशेहून अधिक गावांत स्थानिक पातळीवर उपोषण व आंदोलने सुरू झाली आहेत.

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या तिन्ही वेळच्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. जरांगे यांच्या शिष्टमंडळाची मुंबईतही बैठक झाली. मात्र, त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र घेऊन खोतकर शनिवारी अंतरवाली सराटीत पोहोचले होते. त्यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे उपोषणावर ठाम राहिले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासण्या व उपचार करू दिले नाहीत.

Manoj Jarange: खोतकरांनी आणलेला सरकारी लिफाफा फुटला पण पदरी निराशाच पडली, मनोज जरांगे उपोषण सुरुच ठेवणार

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. आंदोलकांच्या मागण्यांकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. परंतु, इतर समाजाला धक्का न लागता त्यावर तोडगा निघाला पाहिजे. चर्चेतून हा मार्ग निघू शकतो’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed