खान्देशात सर्वाधिक पाऊस होत असलेल्या ऑगस्ट महिन्यातच पावसाने हुलकावणी दिली. पाऊस नसल्याने अद्याप जलसाठ्यांमध्ये देखील जलपातळी समाधानकारक झालेली नाही. तसेच पावसाअभावी अनेक भागात पिके करपू लागल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यात आता बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे खान्देशातील अनेक भागात पावसाचे पुनरागमन झाल्याने संभाव्य दुष्काळाची भीषणता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाऊस झाला असून, अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात तब्बल महिन्याभरानंतर वरुणराजा बरसल्याने, पावसाअभावी जीव तोडत असलेल्या खरीपच्या पिकांना तरतरी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३१ मिमी पाऊस जामनेर तालुक्यात तर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात २५ मिमी पाऊस झाला. महिनाभरापासून पाऊस नसलेल्या चाळीसगाव तालुक्यात १३ मिमी तर अमळनेर तालुक्यात ६ मिमी पावसाची नोंद झाली.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात देखील बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच पाऊस थांबल्याने पुन्हा बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या. या पावसामुळे काहीसे समाधान असले तरी पिकांना संजीवनी मिळण्यासाठी आणखी काही दिवस सलग दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
..तर पिकांना फायदा
या पावसामुळे कापसाच्या कैऱ्यांची खुंटलेली वाढ थांबून कैऱ्या भरण्याची अपेक्षा आहे. सोयाबीनचे दाणे मोठे होण्यास मदत मिळेल. पावसामुळे केळीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास देखील मदत होणार आहे. खरिपाच्या उडीद, ज्वारी व मका पिकांना देखील या पावसाचा फायदा होणार आहे.