या प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत दाभाडे हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. तो सोशल मिडीयावर सक्रीय आहे. ट्रॅक्टरवर स्टंट करून रिल समाजमाध्यमावर टाकण्याच्या बेतात, भारत दाभाडे याने ट्रॅक्टर वेगात चालवून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरवर नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली भारत दाभाडे हा दबला. गावकऱ्यांनी धावून ट्रॅक्टरच्या खालुन भारत दाभाडे याला बाहेर काढले. त्याला घाटीत जखमी अवस्थेत दाखल केले असता, डॉक्टरांनी भारत दाभाडे याला मृत घोषीत केले.
भारत दाभाडे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो आईसोबत शहरात राहतो. त्याचा मोठा भाऊ हा पुण्यात खासगी कंपनीत काम करत आहेत,अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
समाजमाध्यमांचा वापर योग्य करण्याची गरज
गेल्या काही वर्षांमध्ये समाज माध्यमांची संख्या वाढल्यानं आणि तरुणाईच्या हाती स्मार्ट फोन आल्यानं अनेक जणांना ओळख मिळाली. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर करु लागले. स्मार्टफोन आल्यानंतर अनेकांना सेल्फीच्या मोहापायी जीव गमवावे लागले होते. तसाच काहीसा प्रकार रील्स आल्यानंतर होऊ लागला आहे. धोकादायक ठिकाणी जाऊन धाडसी रिल्स बनवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. काही जणांना यामुळं जीव गमवावा लागला आहे. तर, काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देणे, आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणे यामुळं अडचणीत येतात. त्यामुळं सोशल मीडियाचा वापर करताना जपून करणं आवश्यक आहे. अन्यथा सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करण्याचा नादात आयुष्यात मोठी किमंत चुकवावी लागू शकते.