म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने एकीकडे दडी मारली आहे तर दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांत जून, जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त सहा लाख ४६ हजार २९५ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्थिक मदत देण्यासाठी ४३५ कोटी ७४ लाख ७९ हजार रुपयांचा निधी अपेक्षित असून, विभागीय आयुक्तालयामार्फत सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
नांदेड आणि हिंगोली वगळता मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. पावसाने खंड दिल्याने खरीप पिके अडचणीत सापडले असून, पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच लाख ९७ हजार १६ हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

जालना, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्यांत काही प्रमाणात फळपिके आणि बागायती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे. विभागात पाच लाख सात हजार ७३ हेक्टर जिरायती क्षेत्रातील पिकांना फटका बसला. दोन हजार २०४ बागायती क्षेत्राला; तसेच ४३९ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी साडेआठ हजार रुपये, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १७ हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची अर्थिक मदत याप्रमाणे ४३५ कोटी ७४ लाख ७९ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. निधी मागणीचा अहवाल सरकारकडे नुकताच सादर करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.