• Sat. Sep 21st, 2024

मुंबईतील गोखले पुलाची एक मार्गिका वर्षाअखेर खुली, पुलाच्या उभारणीसाठी ३३ बांधकामे पाडली जाणार

मुंबईतील गोखले पुलाची एक मार्गिका वर्षाअखेर खुली, पुलाच्या उभारणीसाठी ३३ बांधकामे पाडली जाणार

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या कामाला मुंबई महापालिकेने गती दिली असली, तरी नोव्हेंबरपर्यंत पुलाची एक मार्गिका सुरू करण्याची मुदत हुकण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेच्या पूल विभागाकडून त्या भागात असलेली होर्डिंग्जची बांधकामे पाडणे, अन्य बांधकामे हटविणे आणि या कामांसाठी पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक उपलब्ध झाल्यानंतरच उड्डाणपुलावर गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस हे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा पूल अंशत: खुला होऊ शकणार आहे.

१९७५मध्ये बांधण्यात आलेल्या गोखले पुलाचा एक भाग ३ जुलै, २०१८ रोजी कोसळला होता. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे हद्दीतील भाग धोकादायक असल्याच्या तक्रारीमुळे त्याचे काम हाती घेण्यात आले आणि ७ नोव्हेंबर, २०२२पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी महापालिका करत आहे. पूल पुनर्बांधणीचे काम मे २०२३पर्यंत पूर्ण करून किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र स्टील पुरवठ्यात उद्भवलेल्या अडचणीमुळे या उभारणीस विलंब झाला. त्यानंतर उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. तर डिसेंबर २०२३ अखेरीस संपूर्ण पूल खुला व्हावा, यासाठी महापालिका प्रयत्नशील होती. पुलावरील एक मार्गिका सुरू होण्यासाठी डिसेंबरचा पहिला आठवडा उजाडणार आहे.

३३ बांधकामे पाडली जाणार

मुंबई महापालिकेचे पूल विभागाचे अधिकारी, स्थानिक आमदार अमित साटम यांनी गोखले उड्डाणपुलाच्या कामाची नुकतीच पाहणी केली. स्टील प्लांटमधील कामगारांचा संप आणि पूल बनवणाऱ्या अंबाला येथील कारखान्यात पाणी साचल्याने कामाला आधीच विलंब झाला आहे. त्याचा फटका पुढील अन्य कामांनाही बसला. आता पुलाचे काम करताना विविध बांधकामे पाडतानाच मेगाब्लॉकही घ्यावा लागणार आहे. सध्या पुलाच्या कामासाठी एकूण ३३ बांधकामे पाडली जाणार असून त्यावर सोमवारी घेतलेल्या आढावात त्यावर चर्चा करण्यात आली. त्यापैकी १९ व्यावसायिक, नऊ निवासी असून ती अधिकृत नाहीत. उर्वरित चार पात्र बांधकामे असून त्यांना पर्यायी जागा दिली जाणार आहे.

मेगाब्लॉक आवश्यक

गोखले पुलाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेला मेगाब्लॉक उपलब्ध करून देण्याची विनंती केल्याचे मुंबई पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले. तसेच पुलाची अन्य कामे पूर्ण करून नोव्हेंबरअखेरीस पुलाच्या एक मार्गिकेचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर ही मार्गिका खुली केली जाईल. उर्वरित पुलाचे कामही एक ते दीड महिन्यात पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed