‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते अर्जनोंदणी प्रक्रियेचा श्रीगणेशा करण्यात आला. पुणे मंडळाच्या या सोडतीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किमती १० टक्क्यांनी घटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक अर्जदारांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोडतीद्वारे ५,८६३ नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत.
पुणे विभागातील म्हाडाच्या घरांची सोडत नव्या संगणक प्रणालीद्वारे राबविली जाणार आहे. त्यातील दुरुस्त्या केल्यानंतर प्रक्रिया सुरुळीत कार्यान्वित होईल, असा विश्वास म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.“म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणे सोडत काढल्यानंतर पुणे विभागातील विजेत्या अर्जदारांना तत्काळ ऑनलाइन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र आणि तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही करावी,’ अशा सूचना जयस्वाल यांनी दिल्या आहेत.
‘म्हाडा’च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अशोक पाटील म्हणाले, ‘म्हाडा’च्या पुणे विभागाच्या सोडतीमध्ये पुणे जिल्ह्यातील पाच हजार ४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (शहरी) ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २५८४ सदनिका आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १६ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.’
‘म्हाडा’ची अर्जप्रक्रिया
– ऑनलाइन अर्जनोंदणीला सुरुवात : ५ सप्टेंबर
– ऑनलाइन अर्जानोंदणीची अंतिम मुदत : २६ सप्टेंबर (सायंकाळी पाचपर्यंत)
– ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत : २७ सप्टेंबर (रात्री ११.५९ पर्यंत)
– ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’द्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत : २९ सप्टेंबर
– सोडत दिनांक : १८ ऑक्टोबर (सकाळी १० वा.)
– सोडतीतील विजेत्यांच्या नावांची प्रसिद्धी : १८ ऑक्टोबर
– सोडतीचे स्थळ : ‘म्हाडा’चे पुणे कार्यालय