डेंग्यूच्या नियंत्रणासाठी शहरात कंटेनर सर्वेक्षण वाढवून शास्रीय पद्धतीने कीटक सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या दट्ट्यानंतर मलेरिया विभागाने धूरफवारणी करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. दर वर्षी पावसाळा सुरू होताच शहरात डेंग्यूचा प्रभाव वाढतो. परंतु, यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही डेंग्यूबाधित रुग्णांचा एकूण आकडा २६१ वर पोहोचल्याने शहरातील धूर फवारणी कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. जूनपर्यंत शहरात अवघे ११६ डेंग्यूबाधित होते. जुलै महिन्यात पाऊस कमी असतानाही २८ रुग्णांची भर पडली. ऑगस्टपासून पाऊस गायब असल्याने डेंग्यूचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. परंतु, ऑगस्टमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव अधिकच वाढत चालल्याने ही बाब चिंतेची बनली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ९९ रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत १७२ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा ऑगस्ट महिन्यातच ११७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा बाधितांचा आकडा २६१ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असतानाही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभाग ‘अॅलर्ट मोड’वर आला असून, शहरात तपासण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा अजब दावा मलेरिया विभागाकडून करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता आरोग्यसेवेचे सहाय्यक संचालक डॉ. व्ही. बी. खातगावर यांनीही पालिकेला पत्र पाठवून कानउघडणी करीत वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचा ठपका पालिकेवर ठेवला आहे.
ठेकेदारासह पर्यवेक्षकांना नोटिसा
राज्य शासनाकडून आरोग्य व मलेरिया विभागाची कानउघडणी केल्यानंतर मलेरिया विभागाने याचे खापर मे. दिग्विजय एंटरप्रायजेस या ठेकेदारावार फोडण्याची तयारी सुरू केली आहे. शहरात धूरफवारणी झाली असती, तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली नसती. परंतु, मलेरिया विभाग वारंवार ठेकेदाराची पाठराखण करीत होता. मात्र, आता शासनाकडूनच कानउघडणी झाल्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येचे खापर ठेकेदारासह पर्यवेक्षकांवर फोडण्याची तयारी सुरू केली आहे. मे. दिग्विजय एंटरप्रायजेसह विभागीय पर्यवेक्षक, कीटक संहारक यांना नोटीस बजावली जाणार आहे.
…अशा आहेत शासनाच्या सूचना
-डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी
-शास्रीय पद्धतीने कीटक सर्वेक्षण करावे
-जलद ताप सर्वेक्षण करावे
-रक्तजल नमुने गोळा करावेत
-डासांच्या उत्पत्तिस्थळी गप्पी मासे सोडावेत
-नागरी स्वच्छता अभियान राबवावे
-कंटेनर सर्वेक्षण वाढविण्यात यावे
-अतिसंवेदनशील भागात धूरफवारणी वाढवावी
-आठवड्यातून एक ‘कोरडा दिवस’ पाळावा
-डेंग्यूसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करावा
…अशी होतेय रुग्णवाढ
जानेवारी- १७
फेब्रुवारी- २८
मार्च- २८
एप्रिल- ८
मे- ९
जून- २६
जुलै- २८
ऑगस्ट- ११७
एकूण- २६१
आरोग्य विभागाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर उपाययोजना केल्या जात आहेत. धूरफवारणी करणाऱ्या ठेकेदारासह पर्यवेक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. शास्रीय कीटक सर्वेक्षण वाढविण्यात आले आहे.
-डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, महापालिका